मुंबई : मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयाला आज दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रं आणि प्रचाराचं साहित्य असल्याने ते आगीमध्ये जळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रविवारचा दिवस असल्याने मुंबईच्या कार्यालयात वेल्डिंगचं काम सुरू होतं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जाते. भाजप कार्यालयाच्या मागच्या बाजूने ही आग लागली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट पसरले होते. या कार्यालयामध्ये कुणीही व्यक्ती अडकला नसल्याची माहिती आहे.
मुंबईतील हे प्रमुख कार्यालया असून या ठिकाणी राज्यभरातून अनेक मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नेहमीच गर्दी असते. पण आज रविवार असल्याने या ठिकाणी कुणीही नव्हतं अशी माहिती आहे. या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर मंत्रालयाचा परिसर आहे. तर या कार्यालयाच्या शेजारी मोठा हॉल आहे. अग्निशमन दलाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.