कल्याण-विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान हातावर मारला होता फटका
डोंबिवली : कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेसच्या दरवाजात उभ्या असलेल्या एका प्रवाशाच्या हातावर रेल्वे मार्गाच्या उभे राहून जोराने फटका मारून मोबाईल चोरी करणाऱ्या आणि संबंधित प्रवाशाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला एक सराईत चोरटा कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी उल्हासनगर मधून अटक केला. आकाश मनोहर जाधव असे अटक चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा महागडा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
प्रभास उर्फ राघव जगदीश भणगे असे मृत प्रवासाचे नाव आहे. हा प्रवासी मुंबईत राहतो. पुणे येथे एका बँकेत नोकरी करतो. होळीसाठी तो मुंबईत घरी आला होता. दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यासाठी तो इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास करत होता. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसचा वेग कमी होताच, रेल्वे मार्गाच्या बाजुला उभ्या असलेल्या आरोपी आकाशने प्रभास भणगे यांच्या हातावर जोरदार फटका मारला. त्याचा तोल गेल्याने तो रेल्वे मार्गात पडून मरण पावला होता. कल्याण लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.
सोमवारी एक दृश्यचित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली. या चित्रफितीमध्ये जहिद जैती नावाचा प्रवासी एक्सप्रेसच्या दारात उभा राहून स्वत:ची प्रतीमा मोबाईलमधून काढत आहे. त्याचवेळी रेल्वे मार्गाजवळ उभ्या असलेल्या एका चोरट्याने त्याच्या हातावर जोराने फटका मारला. परंतु सावध असलेल्या जहिदने मोबाईल घट्ट पकडल्याने तो चोरट्याला रेल्वे मार्गात पाडता आला नाही. या मोबाईलमध्ये फटका मारणारा चोरटा कैद झाला होता. चित्रफितीत दिसणाऱ्या चोरट्याची पोलिसांनी ओळख पटवून त्याला उल्हासनगर येथून अटक केली होती. या अटकेतून पोलिसांनी आकाशजवळील आणखी एक महागडा मोबाईल जप्त केला. तो मोबाईल बंद होता. पोलिसांनी तो मोबाईल सुरू केल्यानंतर तो मोबाईल कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसमधून पडून मरण पावलेल्या पुणे येथील प्रभास भणगे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
या तपासात प्रभास यांचा मृत्यू हा एक्सप्रेसमधून पडून नव्हे तर आकाशने मोबाईल चोरीसाठी त्यांच्या हातावर जोराने फटका मारल्याने प्रभास भणगे यांचा त्यावेळी तोल जाऊन ते रेल्वे मार्गात पडल्याने झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. प्रभास यांच्या मृत्यूला आकाश जाधव हा जबाबदार असल्याने पोलिसांनी त्याच्यावर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.