पुणे व भिवंडीतील दागिने चोरीच्या गुन्ह्यांची उकल
दोन अट्टल चोरट्यांसह 25 लाखांचे दागिने हस्तगत
भिवंडी : ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या भिवंडी गुन्हे शाखा युनिट २ आणि वागळे इस्टेट गुन्हे शाखा – १ यांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत पुणे – दौंड,जळगाव आणि भिवंडीतील ७ घरफोडीच्या घटनांमध्ये समावेश असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून सुमारे 25 लाख रुपये किमतीचे 700 ग्रॅम सोन्याचे व 19 किलो चांदीचे दागिने हस्तगत केले आहे.भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना दोन सराईत घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार ताडाळी जकात नाका या परिसरात येणार असल्याची गोपनीय खबर मिळाल्याने त्यांनी वागळे इस्टेट गुन्हे शाखेच्या मदतीने पाळत ठेवली असता दोन इसम सफेद रंगाची गोणी घेऊन बोलत उभे असल्याचे दिसले.त्यावेळी त्यांना हटकले असता त्यांनी गोणी टाकून पळ काढला.यावेळी चोरटा विकिसींग कल्याणी रा.फेणेपाडा यास पकडण्यात पोलिसांना यश आले तर साथीदार बेनतूसिंग कल्याणी हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.पकडलेल्या विकिसींग याच्याकडे केलेल्या तपासात पुणे ग्रामीण पौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील 22 लाख 56 हजार 560 रुपये किमतीचे 507.04 ग्रॅम वजनाचे सोन्याचे तर 18.386 ग्रॅमचे चांदीचे दागिने गोणीत आढळून आले आहेत.सदर दागिने जप्त करून चोरटा विकिसींग यास अटक केली आहे.तर नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासात जळगाव येथे घरफोडीच्या गुन्ह्यात पकडलेला आरोपी कुंदनसिंग जग्गी यास ताब्यात घेवून त्याचा कसून तपास केला असता त्याने भिवंडी शहरात एकूण सात घरफोडी केल्याचे कबुल केले असून त्याच्याकडून 3 लाख 9 हजार 500 रुपये किमतीचे 200 ग्रॅम सोन्याचे व 500 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत.सदर कारवाई पोलीस आयुक्त परमबीर सिंग,सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे,अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे )मकरंद रानडे,गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज,सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे,पोनि.बी.आर.भोसले आदींच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत,एपीआय सुरेश चोपडे,संदीप निगडे ,प्रकाश पाटील ,पोउनि.संतोष चौधरी ,रविंद्र पाटील ,एएसआय सुभाष अहिरे ,पोह.रवींद्र पाटील ,भोलासाहेब शेळके ,नवनाथ पारधी ,विष्णू सातपुते ,रहीम शेख ,राजेंद्र अल्हाट ,सत्वशील अवचारे ,अनिल पाटील आदींनी पार पाडून सुमारे 25 लाख 66 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.