नवी दिल्ली : सीबीआयनं देशातल्या सात शहरात छापे घालून मानवी तस्करीचं जाळं उद्ध्वस्त केलं आहे. परदेशात नोकरी देण्याच्या आमिषानं भारतीयांना परदेशात नेऊन रशिया-युक्रेन युद्धात लढाईसाठी सैनिक म्हणून भरती होण्यास भाग पाडण्याचं काम या टोळीकडून केलं जात होतं. दरम्यान रशियामध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून यासंदर्भात रशिया सरकारशी चर्चा सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज वार्ताहर परिषदेत सांगितलं.
सात शहरांमध्ये १० पेक्षा जास्त ठिकाणी छापे घातल्यानंतर सीबीआयनं शोधमोहीम राबवली आणि अनेकांना ताब्यात घेतलं आहे. मुंबई, दिल्ली, त्रिवेंद्रम, अंबाला, चंदीगड, मदुराई आणि चेन्नई इथं छापे घालण्यात आले आहेत. आकर्षक नोकऱ्या देण्याच्या आमिषानं रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रात कामासाठी भरती करण्याच्या आरोपाखाली विविध व्हिसा कन्सल्टन्सी कंपन्या आणि दलालांविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आले आहेत. या छाप्यांमध्ये 50 लाख रुपयांच्या रोख रकमेसह, विविध कागदपत्र, लॅपटॉप आदी सामग्री जप्त करण्यात आली आहे.