डोंबिवली : बदलापूर-काटई रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना सापळा लावून कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सात लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे. या त्रिकुटासह त्यांच्या अन्य दोघा साथीदारांनी मिळून कल्याणच्या ग्रामीण भागातील कुशीवली गावाजवळ सुरू केलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर छापा टाकून १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. विराज आलेमकर, मोहम्मद रहमान आणि मोहम्मद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे दोन साथीदार अद्याप हाती लागले नसून पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करताना हा गुटखा कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या कुशीवली गावात एका कारखान्यात बनवला जात असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार, पोनि राहूल मस्के, सपोनि संदीप चव्हाण, सपोनि संतोष उगलमुगले, पोउपनि संजय माळी, हवा दत्ताराम भोसले, प्रशांत वानखेडे, बालाजी शिंदे, विश्वास माने, किशोर पाटील, रमाकांत पाटील, विलास कडू, अनुप कामत, सचिन वानखेडे, गुरूनाथ जरग आदींच्या पथकाने कारखान्यावर छापा टाकला. तेथे सुरू असलेल्या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन, गुटख्याचा साठा कच्चामाल असा तब्बल १७ लाख २९० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुटख्यासाठी लागणारा कच्चामाल हा सुरतवरून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी कल्याण गुन्हे शाखा पथक पुढील तपास करत आहेत.