विरार : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच ३० शास्त्रज्ञ, कृषी संलग्न विभाग आणि प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन ऐतिहासिक आणि शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरला असल्याचे गौरवोद्गार वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी येथे काढले.येथील श्री जीवदानी देवी संस्थान सभागृहात आयोजित ‘ शेतकरी मेळावा, प्रशिक्षण व निविष्ठा वाटप ‘ कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प-बियाणे (पिके) आणि अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प -सिंचन जलव्यवस्थापन योजना अंतर्गत आदिवासी उपयोजना तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन, ‘ आत्मा ‘ पालघर, जिल्हा परिषद पालघर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सर्वदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, बोईसरचे आमदार राजेश पाटील, वसई-विरार महानगर पालिकेचे पहिले मा. महापौर राजीव पाटील, विधान परिषद सदस्य व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे, जिल्हा परिषद पालघरचे अध्यक्ष प्रकाश निकम, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, पालघर जि. प.पशुसंवर्धन समितीचे सभापती संदीप पावडे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशिद, पं.स.पालघरचे सभापती अशोक पाटील, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने, प्रगतशील शेतकरी अनुक्रमे यज्ञेश सावे,अनिल पाटील व रामचंद्र सावे उपस्थित होते.
आमदार हितेंद्र ठाकूर पुढे म्हणाले की, कृषीविषयक नवतंत्रज्ञान निर्मितीत आणि प्रसारात विद्यापीठ व शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची असते त्यामुळे भविष्यात कृषी विद्यापीठाने या दुर्लक्षित भागात भरीव योगदान द्यावे.
वसई विरारचे पहिले मा.महापौर राजीव पाटील म्हणाले की, पालघर जिल्ह्यात भविष्यात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त शैक्षणिक संस्था, अन्न प्रक्रिया महाविद्यालय,विविध पिकासाठी संशोधन केंद्रे होणे गरजेचे आहे.
आमदार राजेश पाटील म्हणाले की,जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र फक्त १२ टक्के असल्याने ते वाढविण्यासाठी विद्यापीठाने सहकार्य करावे.शासकीय योजनांची अंमलबजावणी झाल्यास आणि शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरल्यास तसेच शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग झाल्यास कृषिक्षेत्राचा कायापालट होईल.
आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, फळप्रक्रियेसोबत मत्स्य, हळद, काळीमिरी उत्पादनाला वाव आहे.शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज व जिल्हा नियोजन विभागातर्फे ‘ कोकण कन्याळ ‘ सारखे पशुधन उपलब्ध झाल्यास समृद्धी येईल. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत.
तांत्रिक सत्रात डॉ. आर.टी. ठोकळ,डॉ.पी.सी. माळी, डॉ. वाय. आर. परुळेकर, डॉ. एन. व्ही.म्हसकर, डॉ.एस. व्ही. सावर्डेकर, डॉ. व्ही. पी. सावंत, डॉ. पी. डी. पाटील यांनी त्यांच्या विषयाचे सादरीकरण केले व हे सत्र डॉ.संतोष वरवडेकर यांनी हाताळले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना निविष्ठा किट, पॉवर टिलर,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांना चेक , कृषी व पशुसंवर्धन योजनांचे कॅलेंडर, प्रशस्तीपत्र,आदिवासी उप योजनेंतर्गत ३०० लाभार्थ्यांना रत्नागिरी-८ या भात वाणाची १० किलोची पिशवी, युरिया ब्रिकेट्स ची पिशवी, कृषी दैनंदिनी, केशर आंब्याचे कलम,जलकुंडासाठी लागणारे प्लास्टिक आच्छादन, ठिबक सिंचन सेट चे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी आणि तंत्रज्ञान प्रसाराचे व शेतकरी सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक कृषी विद्यापीठाच्या जलव्यवस्थापन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. आर. टी. ठोकळ यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसई विरार चे प्रथम मा.महापौर राजीव पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.यावेळी सेंट जोसेफ आर्ट अँड कॉमर्स विरार सतपाला च्या चमुंनी पथनाट्य करीत वाहवा मिळविली .मान्यवरांनी दीप प्रज्वलन केल्यावर महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीत गायले गेले.शेतकरी मेळाव्याला ७०० शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *