डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव जवळ नव्याने उभारण्यात आलेल्या माणकोली पुलावर शुक्रवारी दुपारी मित्रांसमवेत रिल बनविल्यावर एका तरुणाने अतिउत्साहाने पुलावरून थेट खाडीत उडी मारली. या घटनेनंतर खाडी परिसरात फिरण्यासाठी आलेल्या मित्रांसह तेथील नागरिकांनी आरडा-ओरडा करून तरुणाच्या बचावासाठी प्रयत्न केले. परंतु हा तरुण काही वेळाने खाडीत दिसेनासा झाला.

ही माहिती विष्णुनगर पोलीस आणि अग्निशमन विभागाला कळताच, त्यांनी तातडीने मोठागाव खाडी किनारी येऊन बेपत्ता तरुणाचा शोध सुरू केला. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की संबंधित तरूणाचे नाव रोहित अशोक मोर्या (२५) असून तो भिवंडीतील कामतघर येथील साई मंंदिर परिसरात राहतो.


रोहित हा त्याच्या मित्रांसमवेत शुक्रवारी दुपारी नव्याने उभारण्यात आलेल्या मोठागाव-माणकोली पूल येथे चित्रफित अर्थात रिल तयार करण्यासाठी आला होता. चित्रफित काढून झाल्यावर रोहितने मित्रांंना काही कळण्याच्या आत माणकोली पुलाच्या कठड्यावरून खाडीत उडी मारली.
रोहित कोणत्याही प्रकारच्या वादात नव्हता. त्याच्या बरोबर कोणाचा वाद नव्हता. किंवा तो तणावाखाली नव्हता, असे त्याच्या मित्रांंनी सांगितले. तरीही त्याने हे कृत्य का केले याबाबत मित्र संभ्रमात पडले आहेत. विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!