डोंबिवली : अनधिकृत फेरीवाल्यांनी नेहमीच गजबजलेल्या डोंबिवली पूर्वेतील चिमणी गल्ली, फडके रोड, राथ रस्ता तसेच नेहरु मार्गावर गेल्या काही दिवसांपासून एकही फेरीवाला दिसत नसल्याने डोंबिवलीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.
डोंबिवली पूर्वेतील ग प्रभागात मागील वर्षभर फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक कारवाई सुरू आहे. हातगाडी चालक, पदपथ, रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर दंडात्मक, सामान जप्ती आणि फौजदारी कारवाई सुरू आहे. फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे, विलास साळवी, सुनील सुर्वे हे तीन पाळ्यांमध्ये कार्यरत राहून ग प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त राहील याची काळजी घेत आहेत. अशीच कारवाई मागील काही दिवसांपासून फ प्रभागाने फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली,बाजीप्रभू चौक या वर्दळीच्या रस्त्यांवर सुरू केली आहे. स्टेशन परिसरात एकही फेरीवाला दिसत नसल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. महापालिकेच्या आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांच्या आदेशामुळे प्रभाग क्षेत्र अधिकारी चांगलेच कामाला लागल्याने डोंबिवली पूर्वेचा स्टेशन परिसरातील रस्ता मोकळा श्वास घेताना दिसत आहे.