मुंबई :भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच केलेल्या गोळीबारामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हे अपयश पोलिसाचं नसून गृहमंत्री आणि भाजपचं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणानंतर राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ५ गोळ्या झाडल्यात या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, भाजपच्या आमदाराने गोळीबार केल्याने हे अपयश पोलिसांचं नाही तर राज्याच्या गृहमंत्री आणि भाजपचं आहे.आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे आम्ही काही करू शकतो, असं त्यांना वाटतं.पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग होत असेल तर गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे.मी लोकसभेत हा मुद्दा मांडणार आणि केंद्रीय गृहमंत्री यांना भेटणार, यांची चौकशी झाली पाहिजे याची मागणी करणार आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर टीका केलीये.
माध्यमांशी संवाद साधताना पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या आधी महाराष्ट्रात असं कधी झालेलं नाही. राज्यात सध्या भयानक गँगवॉर सुरू आहे. राऊत जे बोलतात ते लोकांना आवडत नाही. कॅबिनेटमध्ये नाही तर आता गँगवार रस्त्यावर आले आहेत.त्यांना आता कुणाचीही भीती राहिलेली नाही. पोलिसांची भीती नाही. कॅमेऱ्यासमोर ते गोळ्या झाडतात.
जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा राज्यात गुन्हे वाढतात. गेल्यावेळी ते गृहमंत्री होते तेव्हा नागपूर इज क्राइम कॅपीटल ऑफ महाराष्ट्रा असं अनेक चॅनल्स म्हणायचे.हा गुंडाराज तुमच्यासाठी असेल.आम्ही अजूनही स्वाभिमानाने जगतो.सरकार त्यांना काही शिक्षा करणार नसेल तर आम्ही त्यांच्याविरोधात लढू, असं सुप्रिया सुळेंनी ठामपणे सांगितलं.