कल्याण : कल्याणात मोठा राडा झाला आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच त्यांनी हा गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. जखमी महेश गायकवाड आणि त्यांचा मित्र राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे दोघे ही नातेवाईक आहेत.
महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. जन्या वादाच्या प्रकरणातून दोघे ही उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात गेले होते. ते वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी चर्चा करत असतानाच भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या बॉडीगार्डने महेश गायकवाड यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. त्यातील दोन महेश गायकवाड यांना तर दोन त्यांचे मित्र राहुल पाटील यांना लागल्या आहेत. असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये टोकाचा वाद सुरू आहे यापूर्वीही त्यांनी जाहीर सभांतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. टीका टिप्पणीनंतर एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटात राडा झाल्याने खळबळ उडाली आहे.