नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन पार पडले. यावेळी मोदी म्हणाले की,  आजचा दिवस केवळ मुंबई आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे तर विकसित भारताच्या संकल्पाच्या ऐतिहासिक पुरावा आहे. भारतातील सर्वात लांब असलेल्या अटल सागरी सेतूचे लोकार्पण हा भारताचा विकासाप्रती असलेल्या वचनबध्दतेचा पुरावा आहे. 2014 च्या निवडणुकीआधी रायगड किल्ल्यावर गेलो होतो, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काही संकल्प केले होते. आज ते संकल्प पूर्ण होताना दिसत आहेत. अटल सेतू त्याचाच एक भाग आहे. अटल सेतू ही विकसित भारताची एक झलक आहे महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ बनला पाहिजे, यासाठी केंद्र शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही प्रधानमंत्री मोदी यांनी दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उदघाटन , राष्ट्राला समर्पण आणि पायभरणी करण्यात आली. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतु, (२२.०० कि.मी.) (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एम.टी.एच.एल.) खारकोपर-उरण रेल्वे लाईन प्रकल्प (१४.६० कि.मी.) ठाणे आणि ऐरोली दरम्यान ‘दिघा गाव रेल्वे स्थानक’ भारतरत्नम नेस्ट-१ भवन महानगर प्रदेशाच्या पश्चिम उप-प्रदेशासाठी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (क्षमता ४०३ द.ल.लि.) नवी मुंबई मेट्रो मार्ग-१ बेलापूर ते पेंढार (११.१० कि.मी., ११ स्थानके) खाररोड आणि गोरेगाव दरम्यान नवीन ६ वी रेल्वे लाईन (८.८० कि.मी.) उरण आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय ईएमयू ट्रेनची सुरुवात, नमो अभियान – मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, नारी शक्ती दूत अॅप लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप यांचा समावेश आहे.

मोदी म्हणाले, अटल सेतूमुळे गोवा देखील मुंबईच्या जवळ येणार आहे,” अटल सेतू प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प जपानचे माजी पंतप्रधान शिंझो ॲबे यांच्या समवेत केला होता. सागरी सेतूचं काम पूर्ण होणं, हे मोठे यश आहे. देशासाठी गेल्या 10 वर्षात पायाभूत सुविधांसाठी 44 लाख कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात केंद्र सरकारने सुमारे 8 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि आणखी काम सुरू आहे. ही रक्कम प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी वाढवित आहे, असेही ते म्हणाले.

२ कोटी महिलांना लखपती बनविाार

येत्या काळात देशातील २ कोटी महिलांना लखपती बनविण्याचा केंद्र शासनाचा संकल्प असून विकसित भारत संकल्प अभियानामध्ये महिलांनी नेतृत्व करुन या अभियानाला यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अटल सेतू’ शनिवारी सकाळी खुला होणार..!

अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. हा ‘अटल सेतू’ शनिवार दि. 13 जानेवारीच्या सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे एमएमआरडीएच्यावतीने कळविण्यात आले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *