गुन्हे अन्वेषण शाखा, कल्याण विभागाची कारवाई
डोंबिवली : मालकीणीच्या घरातून १० तोळयाचे सोन्याचे दागिने लंपास करणा-या मोलकरणीला गुन्हे अन्वेषण शाखा, कल्याण च्या पोलिसांनी अटक केली आहे. गंगूबाई उर्फ गिता लक्ष्मण दळवी (50, रा. बालाजी कृपा चाळ, लोटेवाडी, मोठागाव, डोंबिवली-पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून चोरलेले २.९७ लाखांचे दागिने हस्तगत केले आहे. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने तिला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पश्चिमेतील रेतीबंदर रोड परिसरात आशापुरा कृपा सोसायटीत राहणाऱ्या आस्था रणधीर पाटील यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी त्यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हेाता. या गुन्ह्याचा गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू होता. याच दरम्यान क्राईम ब्रँचचे हवा. विश्वास माने आणि पोशि गुरूनाथ जरग यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. या फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यात पाटील या राहत असलेल्या सोसायटीबाहेरच्या कंपाऊंडवरून एक महिला संशयीतरित्या ये-जा करताना आढळून आली.एकीकडे या महिलेला पोनि राहूल मस्के, सपोनि संदिप चव्हाण, उपनि संजय माळी, हवा. विश्वास माने, हवा. बालाजी शिंदे, हवा. दत्ताराम भोसले, हवा. किशोर पाटील, हवा. विलास कडू, हवा. मेघा जाने, हवा. मिनाक्षी खेडेकर, पोशि मंगल गावित, पोशि गुरूनाथ जरग, पोशि नवसारे, शेकडे, लांडगे, चालक अमोल बोरकर यांचे पथक शोध घेत होते.
दरम्यान संशयीत महिलेचे वर्णन तक्रारदार आस्था पाटील यांना दाखवून खात्री केली असता ही महिला आस्था यांच्या घरी काम करणारी मोलकरीण गंगूबाई उर्फ गिता दळवी हीच असल्याचे समोर आले. क्राईम ब्रँचने गंगूबाईला राहत असलेल्या मोठा गावातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरूवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे देऊन फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक विश्लेषणासह पोलिसी खाक्याद्वारे चौकशी केली असता तिने मालकीण आस्था पाटील यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. गुन्हे अन्वेषण विभागाने गंगूबाईकडून तिने चोरलेले १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.चोरीस गेलेले दागिने परत मिळाल्याने पाटील कुटूंबियांमध्ये आनंद व्यक्त होत असून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कौतूक होत आहे.