मुंबई :  अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्याच्या  निमंत्रणावरून भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाद रंगला असतानाच उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीला नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार असून पंचवटी गोदावरी नदीच्या तिरावर महाआरती करणार असल्याचे ठाकरे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे अजूनही अयोध्देचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आले नसून, ते अयोध्येला जाणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, २२ जानेवारीला अयोध्येला कोण जाणार कोण येणार यात मला पडायचं नाही. कारण तो दिवस आम्हाला अभिमानाचा अस्मितेचा दिवस आहे, राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम हा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. याला राजकीय रंग येऊ नयेत, आम्हाला देखील ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही रामाच्या दर्शनाला जाऊ मात्र तोपर्यंत मानपानाचा कार्यक्रम बाजूला ठेवायला हवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.  

नाशिकमध्ये देखील एक रामाचं मंदिर आहे. २२ जानेवारीला या मंदिराच्या प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता. राम आमचा सुद्धा आहे, माझा सुद्धा आहे, हे सांगण्यासाठी त्यांना हा संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे या काळाराम मंदिरात जाऊन आम्ही रामाचं दर्शन घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. 

२३ जानवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवस आहे त्याच दिवशी नाशिक येथे शिवसेनेचे शिबीर होणार असून अंनत कान्हेरे मैदान येथे जाहीर सभा होणार आहे असेही ठाकरे यांनी सांगितले तसेच  प्रभू रामचंद्र काहीकाळ पंचवटीला देखील वास्तव्यास होते, त्याच दिवशी गोदातीरी महाआरती करणार आहोत. असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!