मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण
रायगड, दि. ५ : कोकणची भरभराट झाली पाहिजे, बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा इकडे आला पाहिजे, यासाठी प्रयत्नशील आहे. कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी २० हजार कोटींचा नवा उद्योग येत आहे. कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटीची तरतूद केली असून माणगाव नगरपरिषद बांधकामासाठी १५ कोटी, पावनखिंडीला जाणाऱ्यांच्या विश्रामधामासाठी १५ कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच शासन आपल्या दारी कार्यक्रमातून आत्तापर्यंत २ कोटी १ लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील २६ लाख लाभार्थींना १७०० कोटींचे लाभ दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्रयांनी यावेळी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कुलगुरु प्रा. डॉ. कारभारी काळे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप करण्यात आले.
तळीये दुर्घटनाग्रस्तांना घरांच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आल्या. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचे लोकार्पणही यावेळी झाले. शासन आपल्या दारी कार्यक्रमातर्गत आयोजित आरोग्य शिबिर, कृषी प्रदर्शन तसेच औद्योगिक कंपनी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमाचा हा २० वा कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत २ कोटी १ लाख ९१ हजार ८०३ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. ‘निर्णय वेगवान गतिमान सरकार’ अशा पध्दतीने कामकाज सुरु असल्याचे सांगून, कोकणच्या विकासासाठी जे आवश्यक आहे, ते करु, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.