डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात असलेल्या जय मातोश्री इमारतीच्या तळमजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे या घरातील फ्रिजने पेट घेतला. क्षणार्धात ही आग स्वयंपाक घरात सर्वत्र पसरली. सुदैवाने घरात कुणी नव्हते.

घराला टाळे लावून कुटुंबीय बाहेर गेले होते. या घराच्या खिडकीतून धूर येऊ लागल्याने इमारतीतील रहिवाशांना संशय आला. रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. त्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र तोपर्यंत स्वयंपाकघर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. आगीची झळ स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरपर्यंत पोहोचली असती तर मात्र मोठा अनर्थ ओढवला असता, असे रहिवाशांनी सांगितले. ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *