नाशिक (प्रतिनिधी): मानवाच्या कल्याणासाठी दत्त महाराजांनी झोळी घेतली. त्या झोळीत दत्त महाराज मानवाचे दुःख स्वीकारतात आणि जनतेला सुख देतात असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले.
जगभरातील सर्व स्वामी केंद्रांमध्ये श्री दत्त जयंती सप्ताह साजरा होत आहे. श्री क्षेत्र दिंडोरी येथील प्रदान केंद्रामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींनी सप्ताहाच्या पाचव्या दिवशी सेवेकरांना मार्गदर्शन केले. गुरुमाऊली श्री. मोरे म्हणाले की, दत्तगुरूंचे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी पन्नास वर्षे गाणगापुरात आध्यात्मिक, सामाजिक कार्य केले. या देशावर परकियांनी अनेक धार्मिक संस्थांवर हल्ले केले मात्र गाणगापूर एकमेव दत्तस्थान सुरक्षित राहिले. दत्तप्रभूंनी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या निर्गुण पादुका मागे ठेवल्या. दत्तप्रभू हे एकमेव अवतार असे आहेत की, त्यांनी आपल्या मागे पादुका ठेवल्या मात्र इतर अविष्कारांनी आपल्या मागे काहीही ठेवले नाही याकडे गुरुमाऊलींनी सेवेकरांचे लक्ष वेधले. गाणगापूरमध्ये माधुकरी मागण्याचा रिवाज आहे. अहंकार घालवण्यासाठी माधुकरी मागितली जाते. आपल्यातील अहंकार नष्ट झाल्याशिवाय अध्यात्मिक प्रगती होत नाही.अहंकार नाहीसा झाला की, भक्त परमेश्वरा जवळ पोहोचतो. अहंकारमुक्त, चिंतामुक्त, दुःखमुक्त होण्यासाठी नित्यसेवा महत्त्वाची आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री स्वामी चरित्र सारामृतावर बोलताना ते म्हणाले की, स्वामी सेवामार्गाने नऊ भाषांमध्ये स्वामी चरित्र प्रकाशित केले आहे.स्वामी चरित्र वाचनाने हरवलेली मन:शांती प्राप्त होते.हिमालयातील कर्दळीवनात प्रकटल्यानंतर देशभर पायपीट करून स्वामी महाराज शेवटी अक्कलकोटला पोहोचले. तेथे त्यांनी 22 वर्षे वास्तव करून अनेक सिद्धपुरुष घडवले. त्यानंतर समाधी घेण्याचे केवळ नाटक केले. आजही त्यांच्या लीला सुरू आहेत. अनेकांना दर्शन होते.त्यांचा आविष्कार हा कायम राहील.स्वामींनी मुंबईमध्ये स्वामीसूत यांना मुंबईच्या गादीवर बसविले त्यानंतर दादाबुवांनी कारभार पाहिला पुढे दादाबुवांचा परमपूज्य पिटले महाराजांशी संपर्क झाला आणि १९७४ सालापर्यंत पिटले महाराजांनी विविध प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या जनतेला मार्गदर्शन केले असे गुरुमाऊलींनी नमूद केले. यावेळी मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते.