मुंबई : मुंबईतील आठ समुद्रकिना-यांवर येणा-या पर्यटक आणि नागरिकांच्या सुविधेसाठी फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. समुद्र किनारपट्टी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीच्या मोहीमेंतर्गत तसेच राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही प्रक्रिया सुरू केली आहे.

या ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा-

मुंबईत गिरगाव (०२), दादर आणि माहीम (०८), जुहू (०६), वर्सोवा (०४), वर्सोवा (०१), मढ – मार्वे (०१), मनोरी – गोराई (०२) या आठ समुद्र किनार-यांवर मिळून एकूण २४ फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येतील. या स्वच्छतागृहांच्या संचलन आणि देखभालीची जबाबदारी ही कंत्राटदाराची असेल. आगामी एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रत्येक दिवशी पाच वेळा या प्रसाधनगृहांची स्वच्छता करण्यात येईल. त्यासाठी तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे.

महिला, पुरूष आणि दिव्यांगांसाठी सुविधा-

स्वच्छतागृहांच्या ठिकाणी विजेची सुविधा म्हणून सौरऊर्जेचा वापर करण्याचे प्रामुख्याने सुचवण्यात आले आहे. समुद्र किनाऱयावर उपलब्ध करुन दिल्या जाणाऱया प्रत्येक स्वच्छतागृहात महिला (३), पुरूष (३) आणि दिव्यांग व्यक्तिसाठी (१) याप्रमाणे ७ शौचकुपांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. दिव्यांग व्यक्तिंसाठी ‘लो फ्लोअर’ स्वच्छतागृहांची सुविधा पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

समुद्र किनारपट्टीचा परिसर स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतागृहांची सुविधा पुरविण्याची सूचना केली होती. ही स्वच्छतागृहं उभारणीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ (महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड) यांचे ना हरकत प्रमाणपत्रही उपलब्ध झाले आहे. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतागृह बांधणीची कामे हाती घेतली. किनारी परिसरात स्वच्छतागृह उभारणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रयत्न होत असताना काही ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाला विरोध सहन करावा लागला. याआधी अक्सा आणि वर्सोवा याठिकाणी फिरती स्वच्छतागृहं पुरविण्यात आली आहेत. परंतु स्थानिक विरोधामुळे दोनवेळा या स्वच्छतागृहांची देखील जागा बदलण्याची वेळ आली.

स्वच्छतागृहांच्या अनुषंगाने आवश्यक विविध विभागांच्या परवानग्या उपलब्ध झाल्या आहेत. निविदा प्रक्रियेनंतर कार्यादेश दिल्यावर पुढील चार महिन्यांमध्ये ती फिरती स्वच्छतागृहं समुद्र किनारी कंत्राटदाराने उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत फिरती स्वच्छतागृहं घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत लावण्यात येणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!