डोंबिवली : केडीएमसी कर्मचारी विनोद लंकेश्री याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ल्याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी चार हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या. कमरुद्दीन शेख(२५), अरबाज सय्यद(२६), मोहम्मद इस्त्रालय मोहिद्दीन शहा(३०), शाहरुख शेख (२२)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मात्र हल्ला कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरुन केला गेला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण? याचा तपास पोलीस करीत आहेत.

२७ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९ वाजता डोंबिवली विभागीय कार्यलयाजवळ कर्मचारी विनोद लंकेश्री याच्यावर एका अनोळखी इसमाने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. भर रस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. हल्लेखोर हल्ला करून पसार झाले होते. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिस निरिक्षक आशालता खापरे यांच्या नेतृत्वात पोलिस अधिकारी शहाजी नरळे, पोलिस अधिकारी योगेश सानप, अजिंक्य धोंडे यांच्या तीन पथके तपासाकरीता रवाना झाली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे या हल्लेखोराची ओळख पटवली. हे हल्लेखोर घाटकोपर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी परिसरात सापळा रचत कमरुद्दीन, अरबाज , मोहम्मद शहा, शाहरुख या चार आरोपिंना अटक केली आहे. यामधील कमरुद्दीन याने हल्ला केला होता. तर उर्वरित तीन साथीदार कमरुद्दीनला सुरक्षित पळवून नेण्यासाठी आजूबाजूला लपून बसले होते. या चौघांना अटक करण्यात आली असली या चौघांनी विनोद लंकेश्री यांच्यावर हल्ला का केला, कोणाच्या सांगण्यावरून केला. याचा अद्याप उलगडा झालेला नाही. चौघे हल्लेखोर रिक्षा चालक आहेत. यांचा लंकेश्री यांच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *