कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉक खाली रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन पुरुष व दोन महिलांच्या टोळीने एका इसमाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत लुटणाऱ्या टोळी मधील दोघांना अवघ्या काही तासात महात्मा फुले पोलीसानी बेड्या ठोकल्यात. मायकल शेख, काजोल पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्ले, मद्यपींचा सर्रास वावर असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. या गर्दुल्ल्यांकडून अनेकदा रात्री अपरात्रीच्या सुमारास लोकांना लुबाडण्याचा, महिलांची छेड काढण्याच्या घटना देखील समोर आल्यात. त्यामुळे स्टेशन परिसरात नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. काल रात्रीच्या सुमारास संतोष केसरी हे आपल्या गावी उत्तर प्रदेशात जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आले. त्यांना भूक लागल्याने ते हॉटेल शोधत होते. संतोष स्टेशन परिसरातील स्काय वॉकच्या जीन्या खालून जात असताना अंधाराचा फायदा घेत दोन इसम व दोन महिलांच्या टोळीने त्यांना हटकले. चाकूचा धाक दाखवत संतोष केसरी यांना मारहाण केली व त्यांच्या जवळील 18 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.
याप्रकरणी संतोष यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी या लुटारू टोळी विरोधात गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासातचं पोलिसांनी स्टेशन परिसरात सापळा रचत या टोळीमध्ये दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात मायकल शेख आणि काजोल पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक महिला आणि एक पुरुष यांचा शोध महात्मा फुले पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी तानाजी वाघ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *