डोंबिवली : पतीच्या सततच्या भांडणाला कंटाळुन पत्नी, मुलांसह माहेरी निघून आली. दोन दिवसांनी पती हा पत्नी, मुलांना आणण्यासाठी माहेरी पोहचला. मात्र सासूने मुलीला पाठवण्यास जावयाला नकार दिला. याचा राग आल्याने जावयाने थेट सासूचे अपहरण करून कोंडून बेदम मारहाण केल्याचा धकाकदायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी सासूची सुटका केली असून, जावई भावेश आणि त्याचा मित्र सूरज या दोघांना अटक केली आहे.
तळोजा जवळील एका गावात राहणारा भावेश मढवी याचे कल्याण पूर्वेत राहणाऱ्या दीक्षिता खोकरे हिच्याशी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. काही महिन्यांपासून दीक्षिता आणि पती भावेश यांच्यात कौटुंबिक कारणातून भांडणे होत होती. भांडणाला कंटाळुन पत्नी मुलाला घेऊन रागाने माहेरी निघून आली.
पत्नी व मुलाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी जावई भावेश मित्रासह कल्याणला सासुरवाडीला आला. घरात आल्यानंतर भावेशने पत्नी कुठे आणि मुलाला कोणाला विकले का, असे रागाच्या भरात प्रश्न केले. तुम्ही माझ्या पत्नी, मुलाचे काही तरी वाईट केले आहे असा आरोप करत भावेशने सासू दीपालीला चाकुचा धाक दाखविला. आम्ही तुम्हाला आता पोलीस ठाण्यात नेतो. पोलीस ठाण्यात नेण्याचे खोटे कारण देत भावेश, सूरजने सासूला जबरदस्तीने स्वताच्या वाहनात बसविले. स्वताच्या तळोजा येथील घरी नेऊन डांबून ठेवले. तेथे तिला लोखंडी सळई, कात्रीने मारहाण करण्यात आली.
आई कुठे गेली म्हणून दीक्षिता आईचा शोध करत होती. तिला पती भावेशचा फोन आला. आई माझ्या ताब्यात आहे. तू मुलाला माझ्या ताब्यात दे, असे सांगितले. दीक्षिताने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीय मानपाडा पोलिसांना घेऊन तळोजा येथे पोहचले. तेथे दीपाली जखमी अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी सासू दीपालीची भावेशच्या ताब्यातून सोडवणूक केली. भावेश, सुरजला तात्काळ अटक केली. मानपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुध्द अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.