ठाणे, अविनाश उबाळे : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग महादू बरोरा हे शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात जाहीर प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी पक्षप्रवेशावेळी पांडुरंग बरोरा हे शक्तिप्रदर्शन करणार असून बरोरा यांच्यासोबत यावेळी शहापूर तालुक्यातील त्यांचे किती समर्थक हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सामील होतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बरोरांच्या पक्षप्रवेशामुळे शहापूर विधानसभेची समीकरणे पुढील काळात बदलणार असून आणखी पक्ष प्रवेश व काही राजकीय घडामोडी समोर येतील असे एकंदरीत चित्र शहापुरात दिसत आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय घडामोडी व पक्षप्रवेश होण्यास आता सुरुवात झाली आहे.माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाला राम राम ठोकत शिवसेनेचा भगवा हातात घेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. मात्र नंतरच्या काळात शिवसेना पक्ष फुटून त्यांचे दोन गट तयार झाले. यामध्ये एकनाथ शिंदे यांचा नवीन गट तयार झाला. शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले पांडुरंग बरोरा यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाणे पसंत केले. मात्र फारकाळ शिंदे सोबत न राहता आपली पुढील राजकीय कारकीर्द पाहता आता पुन्हा माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या काकांच्या सल्ल्याने पुन्हा शरद पवारांना साथ देत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात पांडुरंग बरोरा कुटुंब हे जाहीर प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेनेत प्रवेश केला ही माझी मोठी चूक : बरोरा

पांडूरंग बरोरा यांनी सोशल मिडीयावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जो प्रवेश केला होता ती माझी सर्वात मोठी चूक होती. माझे वडील स्वर्गीय महादू बरोरा हे १९७८ सालापासून काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्याबरोबर  एकनिष्ठ व प्रामाणिक काम करीत होते.शरद पवार यांची अखेर पर्यंत साथ त्यांनी सोडली नाही.अशा आठवणी वडिलांच्या सांगत ते म्हणाले की मी पुन्हा स्वगृही परतणार आहे.शरद पवार यांनी मला यासाठी आशीर्वाद दिले आहेत.लवकरच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी स्पष्ट केले आहे.अचानक बरोरा यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सोशल मिडिया व व्हाट्सअपवर बरोरा यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. या पक्षप्रवेश व राजकीय घडामोडींमुळे पुढील काळात शहापूर विधानसभेतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!