Shahpur अविनाश उबाळे : मागील आठवड्यात शहापुरातील एका तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना समोर येत असतानाच ग्रामीण भागात आता डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याची धक्कादायक अशी आकडेवारी शहापूर उपजिल्हा रुग्णालयातून हाती आली आहे.

शहापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी वाड्या वस्त्यांवर तापाच्या आजारांनी एकच थैमान घातले आहे.डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे डेंग्यु ,व टायफाईड,तसेच व्हायरल फिवरची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर शहापूरच्या सरकारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत.

रुग्णालयात तापाच्या रुग्णांचा आकडा हा वाढतच आहे.या वाढत्या तापाच्या साथीमुळे शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांत एकच घबराट पसरली आहे.

शहापूरच्या सरकारी उपजिल्हा रुग्णालयात पावसाळ्यातील ऑगस्ट व सप्टेंबर, महिन्यात तर नुकत्याच सुरू झालेल्या ऑक्टोंबर या तीन महिन्यातील तापाच्या रुग्णांची चिंताजनक अशी आकडेवारी उपजिल्हा रुग्णालयातुन हाती आली आहे.मोठ्या प्रमाणात डेंग्यु, टायफाईड,व्हायरल फिवरचे रुग्ण शहापूर शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी रोज रुग्णालयात येत आहेत यात ऑगस्ट महिन्यात ४७ जणांची डेंग्यूची रक्त तपासणी केली असता यामध्ये ९ जणांना डेंग्यू ची लागण झाल्याचे निदान झाले तर सप्टेंबर महिन्यात ९४ जणांची रक्त तपासणी करण्यात आली असता यामध्ये ४१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ३४ रुग्णांची डेंग्यूची तपासणी केले असता यामध्ये ७ रुग्ण हे डेंग्यूने बाधित असल्याची नोंद शहापूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे.हा सर्वाधिक डेंग्यू तापाचा आकडा समोर येत आहे.डेंग्यू बरोबर टायफाईड तापाचे रुग्ण देखील वाढत आहेत यात ऑगस्ट महिन्यात १,हजार ३२ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासले असता यामध्ये १४८ जणांना टायफाईड ची लागण झाल्याचे निदान झाले तर सप्टेंबर महिन्यात ८८५ जणांच्या रक्ताची तपासणी केली असता यांत १४२ रुग्णांना टायफाईड तापाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

या सर्व रुग्णांची नोंद शहापूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे.उपजिल्हा रुग्णालयात व्हायरल फिव्हर ग्रस्त असलेल्या व संशयास्पद वाटत असलेल्या प्रत्येक रुग्णांच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जात असून डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करुन घेत त्यांच्यावर औषध उपचार केले जात आहेत.

तापाच्या रुग्णांमध्ये तरुण मुले,पुरुष व स्त्रियांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.डासांच्या वाढत्या उत्पत्तीमुळे हे आजार पसरल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.तापाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टरांकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.डेंग्युचे काही रुग्ण शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तर काही रुग्ण कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असून त्यांची निश्चित आकडेवारी मात्र समजू शकली नाही.

दरम्यान शहापूरात डेंग्यू या जिवघेण्या तापाच्या वाढत्या साथीमुळे शहापूर तालुक्यातील नागरिकांत कमालीची घबराट पसरली आहे .

शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा औषध साठा उपलब्ध असल्याने डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांवर वेळीच उपचार केले जात आहेत.यामुळे डेंग्यू झालेले अनेक रुग्ण बरे होत आहेत. -डॉ.राहुल जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *