अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला
मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. गेल्या बारा दिवसांपासून खाते वाटपावर जोर बैठका सुरू होत्या. शिंदे गटाचा विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खात मिळालं आहे. तसेच शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं आणि संजय राठोड यांच्या कडील अन्न आणि औषध खात काढण्यात आलं आहे. महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी खेचून घेतली आहे. त्यामुळे खाते वाटपात शिंदे गटाला धक्का बसला असून, सरकारमध्ये अजित पवार दादा ठरले आहेत.
अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. गेल्या सहा महिन्यांपासून शिंदे गटातील आमदार मंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असतानाच, मागून येऊन राष्ट्रवादीचे आमदार मंत्री बनल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यातच अजित पवार यांनी अर्थ खात्यावर दावा केला होता. मात्र मविआ सरकारच्या काळात अजित पवार अर्थमंत्री असताना निधी मिळत नसल्याची ओरड शिंदे गटातील आमदारांनी केली होती. त्यामुळे अजित पवारांना अर्थ खात देण्यास शिंदे गटातील आमदारांमध्ये विरोध दर्शविला होता. त्यामुळे गेल्या १२ दिवसांपासून शिंदे पवार आणि फडणवीस यांच्या बैठका सुरू होत्या. अखेर हा तिढा सुटत नसल्याने दिल्ली दरबारी पोहचला. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची अजित पवार यांनी भेट घेतल्या त्यानंतर दोन दिवसांनी खातेवाटप जाहीर झालं आहे.
खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेवाटपात काही मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, काही मंत्र्यांची खाती बदलण्यात आली असून मंत्रिपदे कायम ठेवण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
कुणाकडं कोणतं खातं
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास*
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि खात
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
.0000