मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
ठाणे, – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात ‘ लाव रे तो व्हीडीओ’ द्वारे मुंबईतील माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याचा पर्दाफाश केल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झालेली आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अशाच प्रकारे काही अज्ञातांकडून ७ ते ८ अनधिकृत दर्गे उभारल्याची माहिती ठाणे शहर मनसेने उघडकीस आणली आहे. तसेच मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद व दर्गे १५ दिवसात हटवा अन्यथा या ठीकाणी हनुमान मंदिर उभारू असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. दरम्यान, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मनसेने निवेदन दिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात राज्यभरात अनधिकृत मस्जीद,मजार आणि दर्ग्याची उभारणी होत असल्याचे म्हटले होते. या अनुषंगाने सांगली आणि मुंबुईच्या समुद्रात अशा पद्धतीने रातोरात अनधिकृत मशीद उभारल्या जात असल्याचे फोटो व व्हिडीओसहित पुरावे दाखवले. तसेच यावर अंकुश ठेवण्यात सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. याच भाषणात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केल्यानंतर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीतील असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणला आहे.
याच डोंगरावर मुंब्रा देवीचे मंदीर आहे. पारसिक डोंगराचा संपूर्ण भाग वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. या मंदिराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोलनाक्यापर्यंत काही लोकांकडून दर्ग्याची अनधिकृतपणे बांधकामे करण्यात आली आहेत. या दर्ग्याची बांधकामे करण्यामागे वनविभागाची जागा हडप करण्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसुन येत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला.
या अवैध बांधकामास वनविभाग, जिल्हाधिकारी प्रशासन, वीज वितरण, ठाणे महापालिका, पाणी विभाग यांचेकडून सर्व सोईसुविधा देऊन अप्रत्यक्षपणे समर्थन दिले जात आहे का ? तसेच हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि गंभीर आहे. या जागेवर अतिक्रमण करत असलेले भूमाफिया नक्की कोण आहेत? यांना पाठीशी कोण घालत आहे? या सर्व गंभीर गोष्टींची दखल घेऊन येत्या १५ दिवसांत हे अतिक्रमण हटवण्यात यावे, अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच दर्ग्याच्या बाजुला हनुमान मंदिर उभारण्याचे काम सुरु करेल. असा इशारा यावेळी अविनाश जाधव यांनी दिला आहे.