डोंबिवली : डोंबिवलीत घरफोडी करून मुरबाड येथे लपून बसलेल्या वैभव मुरबाडे (30) या चोरट्याला विष्णूनगर पोलीसांनी सापळा रचून बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे. वैभवकडून पोलिसांनी चोरी केलेला ५ लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत केला. तर वडिलांच्या उपचाराचा खर्चासाठीच वैभवने घरफोडीचा मार्ग पत्करल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

पश्चिमेकडील एका इमारती मधील घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.ए भवर,अमोल आंधळे यांनी सदर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा चोरटा मुरबाड येथे राहत असल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी वैभवला सापळा रचून मुरबाड येथून मुद्देमालासह अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *