बहुजनांचे नेतेच बहुजनांसाठी काम करत नाहीत : ॲड.धनराज वंजारी यांची मेळाव्यात खंत
अमरावती : राज्यभरातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व बेरोजगारी आणि वाढती महागाई यांसारख्या गंभीर प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवार दि. २३ डिसेंबर रोजी ‘आप’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नागपूर विधानभवनावरील घेराव मोर्च्यात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धनराज वंजारी यांनी केले.
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून ‘आप’ देखील यासाठी सज्ज झाला आहे. पक्षाकडून राज्यभरात संघटनावाढीच्या दृष्टीने अनेक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. आपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धनराज वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा वरुड तालुक्यातील काठीवाले सभागृह येथे संपन्न झाला. मेळाव्याला संबोधित करतानाॲड.धनराज वंजारी यांनी बहुजनांचे नेतेच बहुजनांसाठी काम करत नसल्याची खंत व्यक्त केली. २३ डिसेंबर च्या मोर्चाला सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ‘आप’चे तालुका अध्यक्ष मंगेश काठीवाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर, अमरावती जिल्हाध्यक्ष संजय पांडव, जिल्हा संघटक .सुभाष गोहत्रे व राजेंद्र सातफळे यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.