मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. याप्रसंगी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्रयांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, “बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आजपासून ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’द्वारे जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.‘आपली मुंबई, माझी मुंबई’ साठी सातत्याने कार्यरत असणा-या देशातील क्रमांक एकच्या महानगरपालिकेद्वारे ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकाद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी घोषित करत व या सुविधेचा स्वतः वापर करत महानगरपालिकेच्या व्हॉट्सअप चॅट-बॉट या सुविधेचे लोकार्पण केले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या लोकार्पण कार्यक्रमाला मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अल्पसंख्याक मंत्री श्री. नवाब मलिक, परिवहन मंत्री श्री. अनिल परब, मुंबईच्या प्रथम नागरिक तथा महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, महानगरपालिकेतील विविध खात्यांचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विविध समाजमाध्यमांद्वारे करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले की, “नवनवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा देतानाच त्या ‘अपडेट’ करणे हे महत्त्वाचे काम आहे. त्याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे. तसेच ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल, तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही. त्यामुळे वेगाने पुढे जात असलेल्या तंत्रज्ञानाचा जनतेला अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल, याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड काळात महानगरपालिकेने केलेले काम कौतुकास्पद आहे. मात्र, काम करताना ते कौतुकासाठी नाही तर कर्तव्य म्हणून करायचे आहे.” तसेच महापालिका म्हणजे नेमके काय, तिचे काम काय आहे, या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्रयांनी यावेळी महानगरपालिका आयुक्तांना केली.

‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेची ही आहेत ठळक वैशिष्ट्ये

१. बृहन्मुंबई महानगरपालिकेची ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर उपलब्ध आहे.
२. ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘Namaste किंवा Hi’ असा संदेश पाठविल्यानंतर महानगरपालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर प्राप्त होते. याच उत्तरानंतर मराठी वा इंग्रजी असे २ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी एका पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे ३ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या पर्यायानुसार महानगरपालिकेच्या सेवा-सुविधांशी संबंधीत पर्याय नागरिकांना उपलब्ध होतात.

३. वरीलनुसार आपल्या आवश्यकतेनुसार नागरिकांद्वारे जे-जे पर्याय निवडले जातील, त्या-त्या पर्यायानुसार तब्बल ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती नागरिकांना तात्काळ उपलब्ध होते. यामध्ये संबंधीत पत्ते, संपर्क क्रमांक, संक्षिप्त माहिती यासारख्या बाबींचा समावेश आहे.

४. या सुविधे अंतर्गत उपलब्ध होणा-या ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती ही ‘लोकेशन’ आधारित पद्धतीने उपलब्ध होत असल्याने एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांपैकी कोणत्या विभागात आहे, याची माहिती अत्यंत सहजपणे व तात्काळ स्वरुपात उपलब्ध होत आहे.

५. वरीलनुसार लोकेशन आधारित पद्धतीने ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ द्वारे माहिती उपलब्ध होत असल्यामुळे एखाद्या व्यक्तिच्या ठिकाणाजवळ असणारे महानगरपालिका दवाखाने – रुग्णालये, कोविड केअर सेंटर, मनपा शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे, अग्निशमन केंद्रे इत्यादी बाबींची माहिती तात्काळ उपलब्ध होत आहे.

६. या सुविधेद्वारे तक्रार वा सूचना करण्याची सेवा उपलब्ध आहे.

७. महानगरपालिकेच्या विविध ऑनलाईन सेवा-सुविधांशी संबंधीत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध.

८. महानगरपालिकेशी संबंधीत विविध शुल्क, आकार इत्यादींचा भरणा करण्यासाठी युपीआय आधारित ऑनलाईन सेवा उपलब्ध.

९. महानगरपालिकेशी व महानगरपालिका क्षेत्राशी संबंधीत विविध घडामोडींची अद्ययावत माहिती उपलब्ध.

१०. महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधांशी संबंधीत प्रमाणपत्रे, परवानग्या इत्यादी विषयीची माहिती.

११. ही सुविधा दिवसाचे चोवीसही तास व आठवड्याचे सातही दिवस (24 x 7) पद्धतीने व भ्रमणध्वनी ऍपद्वारे सहजपणे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना घरबसल्या व अत्यंत सहजपणे माहिती उपलब्ध होणार आहे.

१२. या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी आवश्यक नसून केवळ व्हॉट्सअपद्वारे ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर एक संदेश पाठवून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *