मुंबई दि 1: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे .
या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख , महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक आदी उपस्थित होते .
राज्यातील सर्वानाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सुविधा देतांना आपल्याला मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकासकामांमध्ये मोलाचे योगदान देतो. कष्टकऱ्यांच्या घामातून ही मुंबई उभारली आहे हे आम्ही विसरता काम नये. 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्री आदित्य ठाकरे दिवसरात्र पालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन मुंबईतील विकासकामांची पाहणी करतात असेही ठाकरे यांनी सांगितले.