ठाणे, दि. ३ (प्रतिनिधी) : नौपाड्यातील साड्यांच्या दुकानासमोरील टीएमटीचा थांबा, पोखरण रोड क्र. २ वरील विश्रांती कट्टा परस्पर गायब झाल्याच्या घटना घडल्या असतानाच, आता नितीन कंपनी येथील टीएमटीचा थांबा दुकानांसमोरून हलविण्यात आला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी थांबा हलविण्याच्या प्रकाराला आक्षेप घेतला असून, पूर्वीच्याच ठिकाणी थांबा ठेवण्याची मागणी केली आहे.
ठाण्यातील दुकानांसमोर अडथळा येणारे टीएमटीचे बसथांबे हलविण्याचे उद्योग केले जातात. त्यातून नौपाड्यातील एका दुकानासमोरील थांबा चोरीला गेला होता. त्यासंदर्भात पोलिस तक्रार झाल्यानंतर, तो पुन्हा बसविण्यात आला. तर काही दिवसांपूर्वी एका विकासकाच्या फायद्यासाठी महापालिकेने बसविलेला विश्रांती कट्टा गायब झाल्याचे स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले होते. आता बसथांब्यामागील दुकानांना अडथळा येत असल्यावरून नितीन कंपनी येथील वर्षानुवर्षांचा टीएमटीचा बसथांबा हलविण्यात आला आहे, असा आरोप ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला. या भागातील नागरीकांची मागणी नसतानाही, थांबा परस्पर हलविण्याचा उद्योग का करण्यात आला, त्यात कोणता व्यवहार झाला, असा सवाल पवार यांनी केला आहे. बस थांबा हलविण्याबाबत प्रवाशांकडून सुचना मागविण्यात आल्या होत्या का? अवघ्या २० ते २५ फूट अंतरावर थांबा हलविण्याचे कारण काय? बसथांबा हलविण्याचे पत्र कोणी दिले होते, असा सवालही पवार यांनी केला आहे.