अवयव-दान नोंदणी करुन ‘डोनर कार्ड’ सोशल मिडीयावर ‘अपलोड’ करण्याचे पालिकेचे आवाहन
मुंबई : २७ नोव्हेंबर राष्ट्रीय अवयवदान दिन ! यानिमित्ताने मुंबई महापालिकेने अवयव दान नोंदणी करून डोन कार्ड सोशल मिडीयावर अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे २० हजार दात्यांनी अवयव दानासाठी नोंदणी केलेली आहे. तर गेल्या चार वर्षात सुमारे १ हजार ४७५ व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आले आहे अशी माहिती ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ च्या महाराष्ट्र राज्य व पश्चिम विभागाच्या केंद्र संचालक डॉ. सुजाता पटवर्धन यांनी दिलीय.
मृत्यु हे आपल्या आयुष्यातील चिरंतन सत्य आहे, जे कधीही बदलता येऊ शकत नाही. मात्र या जगातून जाता-जाता आपण समाजातील अनेक गरजूंच्या आयुष्यात आनंद फुलवून त्यांचे जीवन प्रकाशमय करु शकतो. यासाठी अवयव-दान नोंदणी करुन ‘डोनर कार्ड’ सोशल मिडीयावर ‘अपलोड’ करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
२० हजार दात्यांची नोंदणी ….
‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ च्या महाराष्ट्र राज्य व पश्चिम विभागाच्या केंद्र संचालक डॉ. सुजाता पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत सुमारे २० हजार दात्यांनी अवयव दानासाठी नोंदणी केलेली आहे. तर या केंद्राच्या समन्वयातून सन २०१७ पासून आतापर्यंत ५८० मेंदू मृत दात्यांद्वारे ७८० व्यक्तिंना मूत्रपिंड (Kidney), ४८० व्यक्तिंना यकृत (Liver), १३० व्यक्तिंना हृदय (Heart), ४३ व्यक्तिंना फुप्फुसे (Lungs), ६ व्यक्तिंना स्वादुपिंड (Pancreas), ३ व्यक्तिंना आतडे (Intestine) तर ४ हात दान करण्यात आले आहेत. याचाच अर्थ ५८० मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे १ हजार ४७५ व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आले आहे.
२७ नोव्हेंबरच्या राष्ट्रीय अवयव-दान दिनानिमित्त महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये जाऊन अवयव-दान नोंदणी करून त्याबाबतची माहिती आपले जवळचे नातेवाईक व मित्र यांना आवर्जून सांगावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के. ई. एम. रुग्णालयांचे अधिष्ठाता तथा ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.
परळ परिसरात असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (K.E.M. Hospital) येथे देशाच्या पश्चिम विभागासाठीचे आणि महाराष्ट्र राज्याचे ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) चे कार्यालय सन – २०१७ पासून कार्यरत आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच लोकमान्य टिळक महापालिका सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात ‘विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र’ (Zonal Transplant Coordination Centre / ZTCC) कार्यरत आहे. या दोन्ही कार्यालयांद्वारे आपापल्या कार्यक्षेत्रातील अवयवदाना संबंधी सर्व कार्यवाहींचे समन्वयन केले जाते.
विशेष म्हणजे वरील तपशिलानुसार असणा-या ५८० मेंदू मृत दात्यांपैकी २४२ दाते हे मुंबईतील आहेत. या २४२ दात्यांद्वारे सन – २०१७ पासून ३१९ व्यक्तिंना मूत्रपिंड (Kidney), १८५ व्यक्तिंना यकृत (Liver), ६७ व्यक्तिंना हृदय (Heart), २६ व्यक्तिंना फुप्फुसे (Lungs), ६ व्यक्तिंना स्वादुपिंड (Pancreas), एका व्यक्तिला आतडे (Intestine) आणि एका व्यक्तिला दुहेरी हात दान करण्यात आला आहे. याचाच अर्थ २४२ मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे ६०५ व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. पटवर्धन यांनी या निमित्ताने दिली आहे.
प्रतिक्षा यादीवर ६७४८ गरजूंची नोंदणी …
तसेच अवयव दानासंबंधीच्या प्रतिक्षा यादीवर साधारणपणे ६,७४८ गरजूंची नोंदणी आहे. यामध्ये प्रामुख्याने ५,३७४ मूत्रपिंड (किडनी), १,१९४ यकृत (लिव्हर), १०१ हृदय, २१ फुफ्फुसे (Lungs), ५३ स्वादुपिंड (Pancreas) व ५ आतडे (Intestine) यासाठीच्या गरजूंचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेता आपण सर्वांनी अवयव-दाता म्हणून नोंदणी करणे अतिशय महत्त्वाची समाज उपयोगी बाब असून काळाची गरज आहे असे आवाहन पालिकेने केले आहे
राष्ट्रीय पुरस्काराने गौरव ….
१२ व्या भारतीय अवयव-दान दिनानिमित्त, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०२०-२१ या वर्षासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले आहेत. या अंतर्गत सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीचा पुरस्कार हा आपल्या के. ई. एम. रुग्णालयात असणा-या महाराष्ट्र व पश्चिम विभागासाठीच्या ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) या केंद्राला जाहीर झाला आहे. या केंद्राद्वारे ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्रात ८८ मेंदू मृत अवयव दात्यांद्वारे एकूण २४४ अवयवांचे दान करण्यात आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्र व पश्चिम विभागीय केंद्राचा गौरव करण्यात येत आहे.