डोंबिवली : काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे कल्याण जिल्हा अध्यक्ष दिलीप नामदेव गायकवाड यांचे गुरूवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वत्रच हळहळ व्यक्त होत आहे. आठवडाभरापूर्वीच त्यांना ब्रेनस्ट्रोकचा त्रास झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली, सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेत काँगेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, आरपीआयचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, आरपीआयचे जेष्ठ नेते बी. के. जाधव, आरपीआयचे कल्याण युवक जिल्हाध्यक्ष जय जाधव, काँग्रेसचे स्थानिक नेते एकनाथ म्हात्रे, पॉली जेकब आदी विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.