मुंबई : भगवान गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपच्या नेत्यांना घराचा आहेर दिला. “विरोधी पक्षातला प्रत्येक नेता उठतो, हे सरकार पडणार आहे, असा मुहूर्त देतो. प्रत्येक सत्ताधारी नेता आमचं सरकार मजबूत आणि खंबीर असल्याचं म्हणतो. पण तुम्ही सरकार पडणार की नाही पडणार याच्यातून बाहेर येणार आहात की नाही ? याबद्दल मी पक्षातील नेत्यांशी बोलणार आहे,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला.

भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरसुद्धा टीका केली आहे. एकमेकांना खुश करण्याचा नादात जनतेला दुःखी करण्याचं काम राज्यात सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंना शोभतील अशा भूमिका उद्धव ठाकरे घेणार आहेत का, याकडे मी डोळे लावून वाट पाहत आहे, असं त्यांनी म्हटलं. लोकांचं बंद आहे, यांचं व्यवस्थित सुरू आहे, आपलं मंत्रिपद भाड्याने दिल्यासारखं काही लोकांचं काम सुरू आहे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता केली.तुम्ही लोकांसाठी काम करा. आम्ही तुमचं अभिनंदन करू, असंही त्या म्हणाल्या.


राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावायचं काम सुरू आहे. पण हे दोन्ही समाज एकच बहुजन समाज आहेत. त्यांच्यासाठी मी आवाज उठवणार आहे, असं मुंडे म्हणाल्या.मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा घालणार नाही, अशी शपथ मी घेतली आहे, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज जी परिस्थिती आहे, त्यात लोकांना दिशा दाखवण्यासाठी हा भक्ती आणि शक्तीचा मेळावा आहे.हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही. हा लोकांचा कार्यक्रम आहे, असं मुंडे यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *