ठाणे : सामुहिक बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेलाय. साकीनाका, डोंबिवलीच्या जखमा भळभळत असतानाच, आता दिवसाढवळया पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवासी महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. सात ते आठ दरोडेखोरांनी एक्सप्रेसमध्ये घुसून १६ प्रवाशांना चाकूचा धाक दाखवित लुटल्याचा प्रकार घडलाय. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास इगतपुरी ते कसारा दरम्यान ही घटना घडली. कसारा रेल्वे स्थानकावर उतरून आरोपी पळून जात असतानाच दोन आरोपींना प्रवाशांनी मोठ्या धाडसाने पकडलं. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

इगतपुरी स्थानकातून पुष्पक एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना आठ जण एक्स्प्रेसमध्ये चढले. एक्सप्रेसने इगतपुरी स्टेशन सोडताच आठ जणांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवित मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेण्यात आले. यावेळी प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण केली. प्रवासी जखमीही झाले तब्बल १६ प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले, मात्र दरोडेखोर इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी पती सोबत प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय महिलेची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. तब्बल तासभर दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता.

कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामधील सहा आरोपी पसार झाले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच, त्या दोघांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे . प्रकाश पारधी व अर्षद शेख अस या आरोपींच नाव आहे. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटी मध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहात आहे. पिडीत महिलेची तब्येत स्थिर आहे. आठ पैकी सात आरोपी घोटीचे राहणारे असून एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा कल्याण पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *