डोंबिवलीत ज्वेलर्सवर दरोडयाचा प्रयत्न फसला : ज्वेलर्स मालकाचा प्रतिकार, चोरटे पसार

कल्याण ( आकाश गायकवाड) : कल्याण डोंबिवलीत चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असतानाच सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौक परिसरात दोन चोरट्यांनी एका ज्वेलर्सच्या दुकानात गावठी कट्टा दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला .मात्र सोन्याच्या चैनीचा बॉक्स हिसकावून पळ काढण्याच्या तयारीत असतानाच दुकानाचे मालक आणि त्यांच्या मुलाने मोठ्या धाडसाने त्यांना प्रतिकार केल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र दिवसा गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे विष्णुनगर पोलीस व कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग त्यांचा शोध घेत आहेत.

डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरात सम्राट चौक येथे सुरेश जैन यांचे प्रगती ज्वेलर्स नावाने दुकान आहे . सोमवारी सायंकाळी जैन आपला मुलगा अमित जैन यांच्यासह दुकानात असताना दोन अनोळखी तरुण मोटरसायकलने आले त्यांनी आपली मोटरसायकल बाहेर उभी करत ते दुकानात शिरले. सोन्याची चैन घेण्याच्या बहाण्याने दुकानात शिरून आपल्याकडील गावठी कट्याचा धाक दाखवत धमक्या देत दुकानातील सोन्याची सोनसाखळी असलेला बॉक्स घेवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जैन आणि त्यांच्या मुलाने धाडस करत या चोरट्यांना प्रतिकार केला. अचानक झालेल्या प्रतिकाराने घाबरलेल्या या चोरट्यांनी तो बॉक्स टाकून दुकानातून पळ काढला मात्र मोटरसायकल तेथेच ठेवली. या प्रकरणी जैन यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मोटर सायकल ताब्यात घेतली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *