कल्याण दि.26 सप्टेंबर : गोव्यात मिळणारी स्वस्त दारू ठाणे जिल्ह्यात आणून विक्री करण्याचा प्रकार शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात दारूचा साठा, 2 आलिशान वाहनांसह सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. नामांकित हॉटेल्समध्ये गोवा बनावटीच्या दारूचा पुरवठा अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातून होत असल्याचं समोर आलं असून या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मलंगगड भाग हा गोवा बनावटीच्या दारूचा मोठा पुरवठादार बनत   असल्याचे गेल्या काही दिवसांत समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनीही ८ लाखांची गोवा बनावटीची दारू ताब्यात घेत ५जणांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

कल्याणजवळील मलंगगड भागात गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. विशेष म्हणजे डोंबिवली परिसरात निर्माण झालेल्या मोठ्या हॉटेल्समध्ये गोवा बनावटीच्या दारूची मागणी असून या दारूचा मलंगगड भागातून पुरवठा होत असल्याचं समोर आलं आहे. मलंगगडच्या कुंभार्ली गावात असलेल्या एका बंगल्याच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये गोवामेड दारूचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागीय पथकाने जप्त केला आहे.याप्रकरणी कल्याणच्या काटई गावात राहणारा वासुदेव किसन चौधरीसह नेवाळीत राहणारा रंजन शेट्टी आणि गुलाब अहमद राजा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गोवा बनावटीची ५० लाखांची नामांकित कंपन्यांची दारू जप्त करण्यात आली आहे. तर दारू विकत घेणारे ३ ग्राहकही राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहेत.. या सर्व आरोपीना न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. 

स्थानिक पोलीस अनभिज्ञ
दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूची  तस्करी होत असताना स्थानिक पोलिस मात्र त्याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात नेमकं काय समोर येत ते पाहणे महत्वाचं ठरणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षक एन.एन.मोरे, दुय्यम निरीक्षक जी.एच.पाटील, आर.एस.राणे, दुय्यम निरीक्षक,अंबरनाथ विभागाचे निरीक्षक घुले, आर.के.शिरसाट, डोंबिवली विभागाचे निरीक्षक पवार यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!