कल्याण : कल्याणच्या आधारवाडी कारागृहात दोन कैद्यांच्या दादागिरीला कारागृहातील इतर कैदी त्रस्त झाले असतानाच आता या कैद्यांनी टोकदार वस्तूने थेट जेलरवरच हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे कैद्यांची दादागरी कारागृह प्रशासन कधी मोडून काढणार ? असाच सवाल उपस्थित होत आहे.
कारागृहातील जेलर आनंद पानसरे आणि पोलीस शिपाई भाऊसाहेब गांजवे हे या हल्लयात गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात महम्मद अल्ताफ उर्फ आफताब खालिद आणि दिलखुश उर्फ अंकित महेंद्र प्रसाद या दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहात हे दोन्ही कैदी अतिशय हिंसकपणे वागत असल्याचे कारागृह अधीक्षक अ सा सदाफुले यांनी सांगितले.
गुरुवारी ९ सप्टेबर रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जेलर आनंद पानसरे आणि भाऊसाहेब गांजवे कारागृहातील कैद्याच्या बराकीची पाहणी करत होते. याचवेळी महम्मद आणि दिलखुश या कैद्यांच्या बराकीतून जात असतानाच अचानक यातील एका कैद्याने पानसरे यांच्यावर पाठीमागून कोणत्या तरी टोकदार वस्तूने वार केला. त्यांच्या मानेला जखम झाली तर त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या भाऊसाहेब यांच्यावर दुस-या कैद्याने हल्ला केला. आरडा ओरडा होताच इतर कर्मचारी धावत येत त्याच्याकडील टोकदार वस्तू ताब्यात घेतले पेनाच्या झाकणाला अडकविण्यासाठी असलेल्या पत्र्याच्या हँडलला टोक काढून त्यांनी शस्त्र तयार केल्याचे आढळून आले.