ठाणे : अंबरनाथमधील वडापाव विक्रेत्याच्या नऊ वर्षीय मुलाचे ४० लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र कल्याण क्राईम ब्रँन्चच्या पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात चौघा अपहरणकर्त्याना अटक करून, बालकाची सुखरूप सुटका केली. त्यामुळे कल्याण पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.
अंबरनाथ पूर्वेकडे राहणाऱ्या सोनूकुमार बारेलाल सविता यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा ९ वर्ष मुलगा कृष्णा याचे अपहरण केल्याची तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात केली होती. कृष्णा न्यू डेक्कन इंग्लिश स्कूलमध्ये चौथीत शिकत आहे. सद्या शाळा बंद असल्यामुळे तो नजीकच असलेल्या ट्युशनसाठी जात. बुधवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ नंतर परशुराम रेसिडेन्सी येथून येत असताना अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केले. कृष्णा सुखरूप परत हवा असेल तर चाळीस लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी अपहरणकर्त्याने इंटरनेट कॉल वापरून आईवडीलांना दिली. पोलीसांच्या सर्वच यंत्रणा तपास कामाला लागल्या. कृष्णाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणण्यासाठी क्राईम ब्रँचच्या तपासाला वेग वाढला. घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या माध्यमातून संगणक तज्ज्ञांची मदत घेत पोलिसांनी अपहरणकर्त्यापर्यंत पोहचत त्यांना अटक केली यावेळी त्यांच्या तावडीतून कृष्णाची सुखरूप सुटका केली.. क्राईम ब्रँचच्या युनिटचे विनोद चन्ने, किशोर पाटील आणि बाळा पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वपोनि विलास पाटील, सपोनि भूषण दायमा, फौजदार मोहन कळमकर यांच्यासह पथकाने सापळा रचला आणि अपहृत कृष्णाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणले. त्याचबरोबर खंडणीसाठी कृष्णाच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या चारही अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले.
ओळख वाढवली आणि अपहरण केले ..
विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून कृष्णाशी ओळख वाढवली. त्याच्यासोबत क्रिकेट खेळणे, चॉकलेट देणे, गप्पा मारण्याच्या माध्यमातून त्यातील एकाने कृष्णाशी मैत्री केली. मात्र स्वतःचे नाव कृष्णाला कळू दिले नाही. अपहरणकर्त्यांनी कृष्णाचे अपहरण केले मात्र त्याला काहीही कळू न देता त्याच्या आई-वडिलांकडे चाळीस लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुमच्या मुलाला ठार मारण्यात येईल, अशीही अपहरणकर्त्यांनी धमकी दिली होती. मात्र अपहरणकर्त्या चौघांच्या तावडीतून कृष्णाची सुखरूप सुटका करण्यात क्राईम ब्रँचला यश आले.