कल्याण: लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसे कर्मचारी व अधिकारी असणे क्रमप्राप्त आहे. मात्र सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेचे चीफ फायर ऑफिसर व डेप्युटी फायर ऑफिसर निवृत्त झाले असून एक अधिकारी वसई विरार महानगरपालिकेत गेले आहेत. असे असताना आता राहिलेल्या एका अधिकाऱ्यानेही कुळगाव बदलापूर नगर पालिकेत रुजू होण्यासाठी फिल्डिंग लावली असल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निसुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


कल्याण डोंबिवली अग्निशमन दलात अधिकाऱ्यांची कमतरता असताना कुळगाव बदलापूर नगर पालिकेच्या फायर ऑफिसर पदासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील अधिकारी दामोदर वांगड यांची सुरू असलेली धडपड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी पालव हे प्रतिनियुक्तीवर वसई विरार महानगरपालिकेत रुजू झाले आहेत. चीफ फायर ऑफिसर दिलीप गुंड हे २ महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. डेप्युटी फायर ऑफिसर कुलकर्णी हे ही ६ महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. अशावेळी अनुभवी व निवृत्ती जेमतेम २-३ वर्षांवर आलेले फायर ऑफिसर दामोदर वांगड यांच्यावर अग्निशमन दलाची मोठी जबाबदारी होती. मात्र त्यांनी कुळगाव बदलापूर नगर पालिकेत पोस्टिंगसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या फायर ऑफिसरपदी भागवत सोनोने हे कार्यरत आहेत. नगरपरिषद संचालनालयाने त्यांना गेल्या १८ वर्षात कोणतीही पदोन्नती देण्यात आलेली नाही वा गेल्या दहा वर्षांत हजारो अर्ज करूनही वाढीव वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. मात्र वांगड यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ४२०० रुपये ग्रेड पे होता, कुळगाव बदलापूर नगर पालिकेत ४३०० रुपये ग्रेड पे आहे. त्यासाठी नगरपरिषद संचालनालयाने त्यांना ग्रेड पे मध्ये १०० रुपयांनी वाढ करून ऍडजस्ट केले असल्याची चर्चा आहे. नगरपालिकेचे कॅडर झालेले असून मनपाचे कॅडर झालेले नाही. त्यामुळे एकवेळ नगरपालिका अधिकारी महानगरपालिकेत पात्र ठरू शकतो, परंतू महानगरपालिकेचा अधिकारी नगर पालिकेत पात्र ठरत नाही, असेही मत काही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी बदलापुरात पोस्टिंगसाठी नगरपरिषद संचालनालयात व कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत झालेल्या खटाटोपांची चौकशी करण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.


कुळगाव बदलापूर नगर पालिकेच्या अग्निशमन दलात१ फायर ऑफिसर, ५ फायरमन व ३ ड्रायव्हर कार्यरत आहेत. त्यामुळे अतिरिक्त फायर ऑफिसरची गरज नाही. भविष्यात तशी आवश्यकता भासल्यास फायर ऑफिसर प्रशिक्षण घेतलेले ५ फायरमन आहेत.त्यांना आवश्यकतेनुसार पदोन्नती देऊन हे पद भरता येईल. असे असताना कल्याण महानगरपालिकेतुन अधिकारी घेऊन त्यांच्या पगारापोटी दरमहा १ लाख रुपयांचा भुर्दंड कुळगाव बदलापूर नगर पालिकेवर कशासाठी लादला जात आहे?असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *