एल्फिन्स्टन’ दुर्घटनेतील बळींच्या कुटुंबातील व्यक्तीला रेल्वेत नोकरी द्या !
राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
मुंबई : एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या कुटूंबातील व्यक्तींना रेल्वेत सामावून घ्यावे अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले आहे.
या दुर्घटनेत बळी पडलेल्यांना राज्य सरकार व रेल्वे विभागाने आर्थिक मदत जाहीर केली मात्र त्यातील अनेकजण हे कुटूंब प्रमुख होते. घरातील एकमेव कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्यावर कुटूंबाची जबाबदारी होती मात्र कुटूंब प्रमुखाचाच मृत्यू झाल्याने त्या कुटूंबियांच्या भवितव्यावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे अशा कुटूंबातील एका व्यक्तींला शैक्षणिक पात्रतेनुसार रेल्वेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी असे विखे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. या मागणीसाठी त्यांनी पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैन यांची भेट घेतली.
अंगणवाडी सेविकांना किमान १० हजार मानधन द्या
अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनासंदर्भात मंगळवारी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.अंगणवाडी सेविकांना किमान १० हजार रूपये मानधन देण्यात यावे अशी मागणी विखे- पाटील यांनी मुख्यमंत्रयाकडे केलीय. देशातील केरळ, तेलंगणा, पाँडेचेरी सारख्या राज्यांमध्ये अंगणवाडी सेविकांना १० हजारांहून अधिक मानधन दिले जाते. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने अंगणवाडी सेविकांना अवघे साडेसहा हजार रूपये मानधन देण्याचा प्रस्ताव सादर करणे अयोग्य आहे याकडे त्यांनी मुख्यमंत्रयाचे लक्ष वेधले.
यवतमाळच्या १८ शेतकरी मृत्युप्रकरणी ‘एसआयटी’ नेमा
यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा होऊन १८ शेतकऱ्यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी अशीही मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्रयाकडे केलीय. राज्याचे कृषि आयुक्त,विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल न घेतल्याने त्यांना तातडीने निलंबीत करावे. तसेच संबधित औषध कंपन्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे आणि पीडित शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तात्काळ भरीव आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. कापूस, तूर आणि सोयाबीन आदी पिकांवरील किड नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करताना हा प्रकार घडला होता.