मुंबई : भाजपला घाबरवून २० ते २५ आमदार फोडायचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या ५ नेत्यांना तुरुंगात टाकून महाविकास आघाडी मजबूत करायची. असा प्लॅन उद्धव ठाकरेंच्या डोक्यात सुरु होता, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केला. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात भांडूप येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

 मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जसे मातृशक्तीचा आदर करायचे. त्याप्रमाणे आपले सरकार महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या काळात प्रकल्पांमध्ये खुट्टा टाकून ठेवला होता. तो काढून आम्ही प्रकल्पांमधील स्पीड ब्रेकर हटविले. आरे कारशेडच्या कामावरील बंदी हटविली. आरे कारशेड केले नसते तर आपण दहा वर्षे मागे गेलो असतो. हा  प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १० हजार कोटी अधिक लागले असते. बालहट्ट आणि अहंकार यामुळे यापूर्वीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाने राज्याचे नुकसान झाले, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

मेट्रो ३ प्रकल्पासाठी १० हजार कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जास्त घेतले असे सांगून त्याची चौकशी करण्यास सांगितले होते. या चौकशीतून काहीही निघणार नाही, अधिक पैसे खर्च होऊन प्रकल्प लांबेल असे मी त्यांना सांगितले. ते ऐकत नसल्याने त्यांचे अखेर सरकार उलथवून टाकले,  असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई खड्ड्यात गेली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण महापालिका आयुक्तांना खड्डे मुक्त करण्याच्या सूचना दिल्या. मुंबईचे सुशोभीकरण सुरु आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, तर त्याचेही दुःख उबाठाला होते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लगावला. मुंबईतील नालेसफाई मुळे गेल्या पावसाळ्यात कुठे पाणी तुंबले नाही. रस्त्यांवरील धूळ कधी कोणी काढण्याचा विचार केला नाही. पण आपण रस्ते स्वच्छ धुतले, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!