खानदानातील सगळ्यात मोठं कर्ज असे म्हणत गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्राजक्ता माळीने एक फार्महाऊस खरेदी केलं होतं. स्वप्नातलं हे फार्महाऊस उभं करण्यासाठी प्राजक्ताला तिच्या कुटुंबाची मोठी साथ मिळाली होती.

खरं तर एवढं मोठं पाऊल उचलण्यासाठी प्राजक्ताचा भाऊ आणि तिचे वडील साशंक होते. हे कर्ज कसं फिटेल अशी त्यांच्या मनात धाकधूक होती. मात्र आईचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता.

प्राजक्ता तिचं हे स्वप्न सत्यात उतरवेल आणि ती हे नक्कीच करू शकेल असा आईने तिला पाठिंबा दर्शवला होता. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने एका मुलाखतीत ही मोठी झेप घेण्याचे कारण सांगितले आहे.

त्यात ती म्हणते की , “फार्महाऊस खरेदी करणं हे माझ्यासाठी सर्वात मोठं धाडसाचं काम होतं .कारण मुळात हे घर घेण्यासाठी माझ्याकडे तेवढं बजेट नव्हतं. पण जेव्हा मी हे घर बघितलं तेव्हा ते मला इतकं आवडलं की त्यासाठी मी माझ्याजवळ असलेली सगळी पुंजी पणाला लावली.

मला माहित होतं की ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर ती आयुष्यभरासाठी माझ्याजवळ राहणार आहे. महत्वाचं म्हणजे मला निसर्गाची भयंकर आवड आहे. कामातून वेळ काढून दहा बारा दिवस बाहेर जाऊन एकांतात राहायला मला फार आवडतं. आणि म्हणूनच मी हे फार्महाऊस खरेदी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता.”

प्राजक्ताने हे फार्महाऊस खरेदी करण्यासाठी जवळचे सगळे पैसे गुंतवले होते. शिवाय तिच्या आईनेही एफडी मोडल्या होत्या. प्राजक्ताच्या भावाने त्याची सोन्याची चैन देखील गहाण ठेवली होती. तेव्हा कुठे हे फार्महाऊस खरेदी करण्याचे तिचे स्वप्न साकार झाले.

काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने या फार्महाऊसची वास्तुशांती केली होती. तेव्हा प्राजक्ताचे संपूर्ण कुटुंब तिथे हजर होते. आजी आजोबा गावचे नातेवाईक यांच्यासमवेत तिने या वास्तूची पूजा केली होती.

प्राजक्ताचं हे फार्महाऊस खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण झालं असलं तरी मुंबईतही आपलं असं घर असावं अशीही तिने ईच्छा व्यक्त केली आहे. प्राजक्ता केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर एक उद्योजिका म्हणूनही ओळख बनवत आहे.

नृत्याचे क्लासेस, दागिन्यांचा व्यवसाय असे एकाचवेळी ती अनेक दगडावर पाय ठेवत यशाचा पल्ला गाठत आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं तिचं हे दुसरं स्वप्न देखील लवकरच पूर्णत्वास येवो हीच तिला सदिच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!