एस टी कर्मचारी संपाने खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लुटमार 

महाड आगारात पसरला सन्नाटा 

सातवा  वेतन आयोग लागू होणे गरजेचे  – आमदार भरतशेठ गोगावले

महाड – ( निलेश पवार ) :  एन दिवाळी सणात एस.टी.कामगार संपावर गेल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. संपाच्या दुसऱ्या दिवशी महाड आगारात सन्नाटा पसरला होता.  कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात तोडगा निघत नसल्याने संप सुरूच राहिला आणि याचा फायदा मात्र खाजगी वाहन चालकांनी घेतला. दिवाळीत प्रवाशांची खाजगी वाहन चालकांनी अक्षरश: लुटमार केली आहे. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड आगारात कामगारंची भेट घेऊन दिलासा दिला. शिवसेना कायम कामगारांना न्याय देण्यास पुढे राहिली आहे. एस.टी.कामगारांना सातवा वेतन आयोग लागू होणे गरजेचे आहे असे यावेळी कामगारांजवळ बोलताना सांगितले.

संपूर्ण राज्यात महाराष्ट्  एस. टी. महामंडळाच्या कामगारांनी संप पुकारला आहे. संपाचा आजचा दुसरा दिवस असून शासन आणि कामगार यांच्यामध्ये अद्याप तोडगा न निघाल्याने एन दिवाळीत प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत. खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची चांगलीच लयलूट झाली असून पनवेल ते महाड या प्रवासाकरिता प्रवाशांकडून ६०० रुपये मोजले जात आहेत. यामुळे प्रवाशांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. एन दिवाळी सणाला लागलेल्या सुट्ट्या आणि सणाकरिता खरेदी यासाठी प्रवाशी एस.टी. ला प्राधान्य देतात. आजही प्रवाशी संप असला तरी एस. टी. सुरु होण्याची वाट पाहत आहेत. मात्र संप सुरूच राहिला असल्याने प्रवाशी बेहाल झाला आहे. खाजगी वाहन चालक मात्र प्रवाशांकडून चांगलीच लयलूट करत आहेत.

एकट्या महाड आगारात ३३० कामगार संपावर आहेत. त्यातील १० कामगार हे वैद्यकीय रजेवर असल्याने ते या संपात सहभागी नाहीत. महाड आगारात कामगार संपामुळे जवळपास एस.टी.च्या ३९० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. यामुळे १५ लाखाचे नुकसान झाले आहे. महाड आगारात सद्या आगार व्यवस्थापक आणि चार पर्यवेक्षक असे केवळ ४ अधिकारी कामावर आहेत. महाड आगारात या संपामुळे जवळपास ६६ गाड्या उभ्या आहेत तर महाड आगाराच्या देखील गाड्या अन्य आगारात उभ्या आहेत.

महाड आगरात संपावर असलेल्या कामगारांना दुपारी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी भेट देऊन दिलासा दिला. कामगारांची सातव्या वेतन आयोगाची मागणी रास्त आहे मात्र वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन यावर मार्ग निघेल असे सांगून शिवसेना कायम कामगारांच्या बाजूने राहिली आहे. कामगारांना एस.टी.कडून सुविधा मिळत नाहीत त्या देखील मिळणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले. यावेळी कामगार प्रतिनिधी म्हणून कैलास देशमुख आणि अयुब  कुडूपकर  यानी कामगारांचे प्रश्न मांडले. शिवाय ७ व्या वेतन आयोगाची गरज कशी आहे हे सांगितले. महाड आगारात अन्य आगारातील एस टी गाड्या थांबल्या आहेत. यामुळे या एस टी गाड्यांवरील कामगारांचे देखील हाल झाले आहेत. या कामगारांच्या भोजन व्यवस्थेकरिता गोगावले यांच्याकडून २५ हजार रुपये याठिकाणी देण्यात आले तर सतीश सकपाळ या सेना कार्यकर्त्याने देखील ५ हजार रूपयांची मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!