Makar Sankranti (मकर संक्रात) या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो.

या दिवशी प्रत्येकजण ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांत एक दिवसाने पुढे ढकलली जाते म्हणजे १५ जानेवारीला असते.

२०२४ मध्ये मकर संक्रांत १५ जानेवारीला आहे. हिंदु धर्मात संक्रांतीला देवता मानले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसर्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले. हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव. दक्षिण भारतात हे पर्व ‘थई पोंगल’ नावाने ओळखले जाते.

सिंधी लोक या पर्वाला ‘तिरमौरी’ म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक ‘मकर संक्रांत’ म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व ‘उत्तरायण’ नावाने ओळखले जाते.

सण साजरे करण्यामागील अध्यात्मशास्त्र जाणून साजरे केल्यास त्याची फलनिष्पत्ती अधिक असते. मकरसंक्रांतीचे महत्त्व काही सूत्रांद्वारे समजून घेऊया.

मकरसंक्रांत : या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. सूर्यभ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी दर ऐंशी वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो.

या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतच्या काळाला दक्षिणायन म्हणतात. या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते.

या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो.

कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात मरण येणे अधिक चांगले समजले जाते.

मकरसंक्रांतीचे व्यावहारिक महत्त्व : भारतीय संस्कृतीत मकर संक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो.

या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. या दिवशी इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवाच्या समोर ठेवावा. त्यामुळे तीळगुळातील शक्ती आणि चैतन्य टिकून रहाते. तीळगूळ देतांना आपल्यात चैतन्य आणि वेगळाच भाव जागृत होतो.

व्यावहारिक स्तरावरील जिवाला घरात असलेल्या वातावरणातील चैतन्याचा लाभ होतो. त्याच्यातील प्रेमभाव वाढतो. त्याला नकारात्मक दृष्टीकोनातून सकारात्मक दृष्टीकोनात जाण्यास साहाय्य होते.

तीळगुळाचे महत्त्व 

तिळामध्ये सत्त्वलहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते.

मकरसंक्रांतीचे साधनेच्या दृष्टीने महत्त्व : मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे वातावरण जास्त चैतन्यमय असते. साधना करणार्या जिवाला या चैतन्याचा सर्वाधिक लाभ होतो. या चैतन्यामुळे त्या जिवातील तेजतत्त्व वृद्धींगत व्हायला साहाय्य होते. या दिवशी प्रत्येक जिवाने वातावरणातील रज-तम वाढू न देता अधिकाधिक सात्त्विकता निर्माण करून त्या चैतन्याचा लाभ करून घ्यावा. मकरसंक्रांतीचा दिवस साधनेसाठी अनुकूल आहे. त्यामुळे या काळात अधिकाधिक प्रमाणात साधना करून ईश्वर आणि गुरु यांच्याकडून चैतन्य मिळवण्याचा प्रयत्न करा.

साधनेला अनुकूल काळ :‘संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो; कारण या काळात ब्रह्मांडात आप, तसेच तेज या तत्त्वांशी संबंधित कार्य करणार्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते.’

एका ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग दाखवणे : ‘संक्रांती ही मातीच्या घड्याचे पूजन आणि उपायन देण्याचा विधी यांद्वारे पाच तत्त्वांनी बनलेल्या जिवाच्या देहाद्वारे साधना करून त्रिगुणांचा त्याग करून द्वैतातून अद्वैतात, म्हणजे एका ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग दाखवते.

प्रकाशमय कालावधी

या दिवशी यज्ञात हवन केलेली द्रव्ये ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर देव अवतरित होतात. याच प्रकाशमय मार्गाने पुण्यात्मा पुरुष शरीर सोडून स्वर्गादी लोकी प्रवेश करतात; म्हणून हा कालावधी प्रकाशमय मानला गेला आहे.

या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे महत्त्व :या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे अथवा तीळ-तांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करण्याचेही विधान आहे. या पर्वाच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. तिळाचे उटणे, तीळमिश्रित पाण्याचे स्नान, तीळमिश्रित पाणी पिणे, तिळाचे हवन करणे, स्वयंपाकात तिळाचा वापर, तसेच तिळाचे दान हे सर्व पापनाशक प्रयोग आहेत; म्हणून या दिवशी तीळ, गूळ, तसेच साखरमिश्रित लाडू खाण्याचे, तसेच दान करण्याचे अपार महत्त्व आहे. ‘जीवनात सम्यक् क्रांती आणणे’, हे मकरसंक्रांतीचे आध्यात्मिक तात्पर्य आहे.

मकरसंक्रांतीला दिलेल्या दानाचे महत्त्व :धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते.

हळदीकुंकवातील पंचोपचार :

1. हळद-कुंकू लावणे : हळद-कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील श्री दुर्गादेवीचे सुप्त तत्त्व जागृत होऊन हळद-कुंकू लावणार्या सुवासिनीचे कल्याण करते.

2. अत्तर लावणे : अत्तरातून प्रक्षेपित होणार्या गंधकणांमुळे देवतेचे तत्त्व प्रसन्न होऊन त्या सुवासिनीसाठी कमी कालावधीत कार्य करते (त्या सुवासिनीचे कल्याण करते).

3. गुलाबपाणी शिंपडणे : गुलाबपाण्यातून प्रक्षेपित होणार्या सुगंधित लहरींमुळे देवतेच्या लहरी कार्यरत होऊन वातावरणाची शुद्धी होते व उपचार करणार्या सुवासिनीला कार्यरत देवतेच्या सगुण तत्त्वाचा अधिक फायदा मिळतो.

4. वाण देणे : वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे म्हणजे दुसर्या जिवातील देवत्वाला तन, मन व धन यांच्या त्यागातून शरण येणे. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वस्त्राच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन वाण देणार्या सुवासिनेला इच्छित फलप्राप्ती होते.

मकर संक्रांती निमित्तचे हळदी-कुंकू रथसप्तमी पर्यंतच का करावे ? – रथसप्तमी पर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदीकुंकू केले जाते. त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊ लागते, त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते.

वाण कोणते द्यावे ? 

साबण, प्लास्टिकच्या वस्तू यांसारख्या वस्तूंचे वाण देण्याऐवजी सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, देवतांची चित्रे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.

संक्रांतीच्या दुसर्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

सौजन्य : सनातन संस्था

संपर्क : 9920015949

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!