मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी रात्री गुजरातमधील भुज येथून दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही बिहारमधील रहिवाशी आहे. या आरोपींना मुंबईत आणून अधिक चौकशी केली जाणार आहे. सध्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याने रविवारी सकाळी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत.
रविवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी सलमान खान राहात असलेल्या गॅलॅक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला. गोळीबारात एक गोळी खिडकीतून सलमान खानच्या घरात शिरली तर, एक गोळी भिंतीत शिरली होती. दरम्यान, “गोळीबारानंतर मुंबईतून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. एका दिवसात दोन्ही आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासात आरोपींची ओळख पटवली आहे.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यापूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमानला धमकी दिली होती. त्यानंतर त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत जीवे मारण्याची धमकी देणारे फोन, ईमेल आणि पत्रेही आली होती. आता गुन्हे शाखेने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.