पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून मनसेच माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. पुण्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढतीची शक्यता असतानाच आता वंचितमुळे उमेदवार दिल्याने पुण्यात तिहेरी सामना हेाणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मोरे यांना वंचितची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप काँग्रेस आणि वंचित असा तिहेरी सामना होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीची पुण्यामध्ये ताकद आहे. पक्षाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने ६५ हजार मते घेत तिसऱ्या स्थानावर राहिले होते. वंचितच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसू शकते.