मुंबई, दि. ११  : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष  मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

पुण्यात  ८२ लाखांहून अधिक मतदार

पुण्याची एकूण मतदार संख्या ८२  लाख ८२ हजार ३६३ आहे. तर मुंबई उपनगरची एकूण मतदार संख्या ७३ लाख ५६ हजार ५९६  इतकी आहे. ठाण्याची एकूण मतदार संख्या ६५ लाख ७९ हजार ५८८, नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या ४८ लाख ०८ हजार ४९९ इतकी आहे. तर नागपूरची एकूण मतदार संख्या ४२ लाख ७२ हजार ३६६ इतकी आहे.

रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गात महिला मतदारांची संख्या अधिक

चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक आहेत. रत्नागिरीची एकूण मतदार संख्या १३ लाख ०३ हजार ९३९असून यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ३१ हजार १२ आहे तर महिला मतदारांची संख्या ६ लाख ७२ हजार ९१६ इतकी आहे. नंदुरबारची एकूण मतदार संख्या १२ लाख ७६ हजार ९४१ असून यामध्ये १२ तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ३७ हजार ६०९आहे तर महिला मतदारांची संख्या ६ लाख ३९ हजार ३२० इतकी आहे. गोदिंया जिल्हयातही महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गोंदियाची एकूण मतदार संख्या १० लाख ९२ हजार ५४६असून यामध्ये १० तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ५० लाख ४१ हजार २७२ आहे तर महिला मतदारांची संख्या ५ लाख ५१ हजार २६४ इतकी आहे. सिंधुदुर्गची एकूण मतदार संख्या ६लाख ६२ हजार ७४५असून यामध्ये १ तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३ लाख ३० हजार ७१९  आहे तर महिला मतदारांची संख्या ३ लाख ३२ हजार २५ इतकी आहे.

राज्यात १९  एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे अशा पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. राज्यात ८ एप्रिल २०२४ पर्यंत एकूण ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदारांची नोंद आहे. यामध्ये ४ कोटी ८० लाख ८१ हजार ६३८ पुरुष मतदार तर ४ कोटी ४४ लाख ४ हजार ५५१ महिला मतदार आणि ५ हजार ६१७  तृतीयपंथी मतदार आहेत.

५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार

अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. अहमदनगरमध्ये एकूण मतदार ३६ लाख ४७ हजार २५२ आहेत. सोलापूरमध्ये एकूण मतदार ३६ लाख ४७ हजार १४१ आहेत. जळगावमध्ये एकूण मतदार ३५ लाख २२ हजार २८९ आहेत. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार ३१ लाख ७२ हजार ७९७ आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण मतदार ३० लाख ४८ हजार ४४५ आहेत.

बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या १०जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!