मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांना सोयीसुविधा पुरवा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक आयोगाला पत्र.

मुंबई, दि. २० एप्रिल : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ तारखेला पार पडला असून मतांची टक्केवारी समाधानकारक दिसत नाही. जनतेमध्ये मतदान करण्याचा उत्साह आहे परंतु राज्यात सगळीकडे ४० अंशांपेक्षा जास्त तपमान असल्याने मतदानासाठी घराबाहेर पडणे आरोग्याच्या दृष्टीनेही त्रासदायक आहे. बहुतांश मतदान केंद्रात सोयीसुविधा नाहीत, मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या आवारात तात्पुरते शेड बांधावे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले म्हणतात की, राज्यात ४० अंशांच्या वर उन्हाचा पारा असल्याने या कडक उन्हात मतदान करणे नागरिकांना त्रासदायक होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या उन्हाचा जास्त त्रास होतो. कडक उन्हामुळे उष्माघातासारखा जीवघेणा प्रकार ओढवू शकतो. मतदानासाठी तासंतास रांगा लावाव्या लागतात, कडक उन्हात मतदानासाठी रांगा लावणे हे सुद्धा त्रासदायक आहे. नागरिकांचा या कडक उन्हापासून बचाव व्हावा यासाठी निवडणुक आयोगाने सुविधा पुरवल्या पाहिजेत. उन्हापासून बचाव करण्याची सोय उपलब्ध झाली तर मतदानाची टक्केवारीही वाढण्यास मदत होईल, असेही पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!