मुंबई : ऍक्टिस या जागतिक खासगी इक्विटी फर्मचे पाठबळ लाभलेली आणि वाढती बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) असलेल्या प्रोफेक्टस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड (पीसीपीएल), ला भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) कडून फॅक्टरिंग रेग्युलेशन कायदा, 2011 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र (सीओआर) प्राप्त झाले आहे. सीओआर मंजूर झालेल्या काही पहिल्यावहिल्या एनबीएफसींपैकी पीसीपीएल आहे. हा टप्पा मध्यम आणि लघुउद्योग क्षेत्रातील म्हणजेच एमएसएमई ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी पीसीपीएलला फॅक्टरिंग सेवा सुरु करण्यास सक्षम करणारा आहे.
प्रोफेक्टस कॅपिटल त्यांच्या ग्राहकांना खेळते भांडवल व्यवस्थापन सुधारण्यासाठी, त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि विविध कार्यप्रणालीसाठी अल्पकालीन वित्तपुरवठा करण्यासाठी समयबध्द आणि कार्यक्षम अशी फॅक्टरिंग सेवा देण्याची विशेष योजना आखत आहे. क्लस्टर-आधारित कर्ज देण्याच्या दृष्टिकोनावर आधारित निवडक उत्पादन आणि सेवा क्षेत्रांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याची योजना पीसीपीएल सुरु ठेवणार आहे.
बीबीबी- आणि त्याहून अधिक पतमापन दर्जा मिळालेल्या कॉर्पोरेट खरेदीदारांवर लक्ष केंद्रित करण्याची आणि मोठ्या प्रमाणात मागणी असूनही ती अपुर्ण असलेल्या क्षेत्राला फॅक्टरिंग सेवा प्रदान करण्याची प्रोफेक्टस कॅपिटलची योजना आहे. संबंधित कंपन्यांना केल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याचे मूल्य अर्थातच सहाय्यासाठी विचारात घेतल्या जाणाऱ्या ग्राहक कंपन्यांच्या विविध घटकांच्या जोखीमेनुसार बदलू शकते.
प्रोफेक्टस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि सीईओ श्री के. व्ही. श्रीनिवासन म्हणाले की, संपूर्ण भारतातील एमएसएमईंना अर्थसहाय्यांबाबतचे नानाविध उपाय सादर करण्यात आम्ही आघाडीवर आहोत. आरबीआयकडून आमच्या अर्जाला त्वरित मंजुरी मिळाल्याने आम्ही खूपच आनंदीत आहोत. आरबीआयकडून मिळालेली मंजुरी आम्हाला आमच्या विद्यमान बाजारपेठांमध्ये अधिकाधिक विस्तार करण्यास आणि आमचा ग्राहकवर्ग आणखी वाढविण्यास सक्षम करणारी आहे. बिगर बँकिंग वित्तसंस्थांच्या समावेशामुळे पुढील दोन वर्षांमध्ये फॅक्टरिंग विश्व लक्षणीयरीत्या विकसित होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसेच कमी खर्चात रोख प्रवाहात तात्काळ सुधारणा झाल्याने एमएसएमईला लक्षणीय फायदा होण्याची अपेक्षा आहे.