नवी दिल्ली : देशभरातील ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून विशिष्ट लोकांचा गट न्यायालयावर राजकीय दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे.  सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे, पिंकी आनंद, हितेश जैन, मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, उज्वला पवार, उदय होल्ला आणि स्वरुपमा चतुर्वैदी यांचा समावेश आहे. सरन्यायाधीश यांना लिहिले गेलेल्या पत्रावर देशभरातील ६०० वकिलांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनी दिली आहे. देशातील ६०० वकिलांनी केलेल्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. 

वकिलांनी या पत्रात म्हटले की, राजकीय नेते आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. “हेतुपुरस्सर न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका गटाकडून केला जात आहे. त्यामुळे न्यायाव्यवस्थेच्या कार्याचे वैशिष्ट्य असलेले विश्वास आणि सौहार्दाचे वातावरण बिघडत आहे. राजकीय आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे न्यायालयाला धमकावले जात आहे. तसेच लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होत आहे”, अशी चिंता या पत्रातून व्यक्त करण्यात आली.

वकिलांनी म्हटले की, राजकारणी एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि नंतर न्यायालयात त्यांचा बचाव करतात हे फार विचित्र आहे. न्यायालयाचा निर्णय त्यांच्या इच्छेनुसार नसेल तर ते न्यायालयाच्या आत किंवा माध्यमांतून न्यायालयावर टीका करू लागतात. काही घटक न्यायाधीशांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडक प्रकरणांमध्ये न्यायाधीशांवर त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी दबाव आणत आहेत आणि हे सोशल मीडियावर खोटे पसरवून केले जात आहे. त्यामुळे आम्ही सरन्यायाधीश चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की, त्यांनी अशा हल्ल्यांपासून आमच्या न्यायालयांचे संरक्षण करण्यासाठी काही ठोस पावले उचलावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!