गौतम बुद्धांचा अहिंसा, प्रेम आणि करुणेचा संदेश आजही समर्पक
– राष्ट्रपती रामनाथ कोविंद
ड्रॅगन पॅलेस येथे विपश्यना केंद्राचे उद्घाटन
नागपूर : गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानात क्रांतीकारी चैतन्य सामावले असून त्या तत्वज्ञानात मानवता केंद्रस्थानी आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतीदूत गौतमबुद्धांचे अहिंसा, प्रेम आणि करुणेचा संदेश देणारे विचार मार्गदर्शक व समर्पक असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. कामठी ड्रॅगन पॅलेस येथे विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर जाहीर कार्यक्रमात राष्ट्रपती कोविंद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापिका ॲड. सुलेखा कुंभारे उपस्थित होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, महाराष्ट्र ही अध्यात्माची पावनभूमी आहे. ही भूमी आस्था आणि ज्ञानासाठी सुपरिचित आहे. नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले आहे. बौद्ध धर्माचा प्रसार आशिया खंडातून पुढे जगभर झाला. गौतम बुद्धांचे ज्ञान, तत्वज्ञान आजही आपल्याला प्रेरणा देतात. सम्राट अशोक तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक महापुरुषांनी या विचारांपासूनच प्रेरणा घेतली. आपले संविधानही गौतम बुद्धांच्या विचारधारेचे अनुसरण करणारे आहे. ज्याद्वारे समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पालन करण्यास आपण कटीबद्ध आहोत. भारतात संसदीय पद्धती बौद्ध भिक्कु संघात प्रचलित असल्याचे दाखले पाहावयास मिळतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी याच तत्वांचा समावेश राज्यघटनेत अंतर्भूत केला. बौद्ध तत्वज्ञानात समाजसुधारणेचा आदर्श घालून देण्यात आला आहे. याद्वारे अनेक समाजसुधारणा आंदोलनांना प्रेरणा मिळाली आहे. महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारणा चळवळींनीही देशापुढे आदर्श निर्माण केला. विपश्यना पद्धती आज जगभर अनेकजण आत्मसात करीत असून लोकप्रिय होत आहे. गौतम बुद्धांची ध्यानाची संकल्पना आणि उपासना पद्धतीच विपश्यना आहे. विपश्यना म्हणजे आत्मशोध. विपश्यनेमुळे मन आणि शरीर शुद्ध होण्यास मदत होते. आधुनिक जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठीही विपश्यना उपयुक्त ठरते. विपश्यनेच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्रात सुरु असलेले कार्य उल्लेखनीय आहे, असेही राष्ट्रपती कोविंद यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ड्रॅगन पॅलेस तसेच दीक्षाभूमी देशात तसेच परदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. ही दोन्ही स्थळे नागपूर आणि देशाची ओळख बनली आहे. कामठी येथील विपश्यना केंद्रामुळे गौतम बुद्धांचे तत्वज्ञान जगभर पोहचविण्यास मदत होईल. विपश्यना केंद्र आणि येथील कौशल्य विकास केंद्र, मानवता, मैत्री आणि शांततेचा संदेश देणारा मैलाचा दगड ठरेल. विपश्यना हे कोणतेही अवडंबर नाही, कर्मकांड नाही. विपश्यना व्यक्तीला शक्ती देते. यामुळे आत्मबल वाढण्यास मदत मिळते. चांगल्या कार्यासाठी प्रेरणा मिळते. या विपश्यना केंद्राद्वारे गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश जगभर पोहचविला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे नागपूरला ऐतिहासिक महत्व आहेच. देशातून आणि परदेशातून दीक्षाभूमीवर भाविक येतात. गौतम बुद्धांचे सत्य, अहिंसा हे पंचशिलाचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि मेडिटेशन सेंटर जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरेल. नागपूरहून आगामी काळात अनेक देश विमानसेवेने जोडण्यात येतील. तसेच नागपूर मेट्रो कामठी-कन्हानपर्यंत जोडण्याचा विचार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापिका ॲड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, ड्रॅगन पॅलेस येथे वैशिष्ट्यपूर्ण विपश्यना केंद्र उभारणीचे स्वप्न होते. ते साकार होत आहे. या विपश्यना केंद्रात साधकांसाठी, विद्यार्थी तसेच अधिकाऱ्यांसाठी विपश्यना शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. या अप्रतिम विपश्यना केंद्र उभारणे दक्षिण भारतातील कामगारांचे योगदान मोठे आहे. या विपश्यना केंद्राद्वारे शांती, मैत्री तसेच मानव कल्याणकारी विचार पोहचविण्यात येतील, असेही कुंभारे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजनात राज्याचा सामाजिक न्याय विभागाचा सहभाग होता. ड्रॅगन पॅलेस येथील वैशिष्ट्यपूर्ण विपश्यना केंद्र गौतम बुद्धांचे तत्वज्ञान जगभर पोहचविणारे केंद्र ठरेल. असे विचार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आभार मानतांना व्यक्त केले.